जळगाव : खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhari) यांचे माहेर असलेले आसोदा गाव आता केवळ वांग्याच्या भरितासाठीच नाही, तर अस्सल खान्देशी ओल्या मसाल्यासाठीदेखील राज्यभरात प्रसिद्ध होत आहे. जिल्ह्यात ज्यांना तरीबाज शेवभाजी किंवा इतर झणझणीत पदार्थ खायचे असतात, ते अनेकदा आसोद्यातील ढाबे आणि हॉटेल्सचा रस्ता धरतात. या गावातील मसाल्यांची निर्यात आता राज्यभर होऊ लागली आहे.
आसोदा गावाच्या मसाल्यांना मिळणारी वाढती पसंती पाहून, गावातील काही महिला बचत गट, शेतकरी व काही युवा उद्योजकांनी अभिनव प्रयोग सुरू केला. सुरुवातीला सुरेश भोळे नामक शेतकऱ्याने घरीच खास ओला मसाला तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मसाल्यांना प्रचंड मागणी वाढू लागली, त्यानंतर गावातील अनेक कुटुंबांनी घरगुती मसाला तयार करण्याचे काम हाती घेतले. बघता-बघता एक जोड व्यवसाय म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता अनेकांसाठी कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.
आठवड्याला ४ ते ५ क्विंटल मसाला राज्यभर !
सध्या आसोदा गावातील ३० ते ३५ कुटुंबे ओले मसाले तयार करण्याच्या उद्योगात सक्रिय आहेत. विशेष म्हणजे, हे ओले मसाले केवळ जिल्ह्यातच नाही, तर मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सुरत आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही पाठविले जात आहेत. आठवड्याभरात तब्बल ४ ते ५ क्विंटल ओले मसाले राज्यभरात वितरित केले जातात. काही जण हे मसाले पाकीटबंद पिशव्यांमध्ये पाठवतात, तर काही जण पाण्याच्या जारमध्ये भरून मुंबई-पुण्याला पाठवत आहेत.
हे घरगुती मसाले केवळ सामान्य घरांमध्येच नाही, तर अनेक मोठमोठ्या हॉटेल्समध्येदेखील वापरले जात आहेत. यामुळे आसोदा गावच्या ओल्या मसाल्यांना एक वेगळीच प्रतिष्ठा मिळाली आहे. संदीप नारखेडे, सुरेश भोळे यांच्यासह अनेक या मसाल्याच्या उद्योगात सक्रियपणे काम करीत आहेत.
सुरुवातीला हा एक छोटासा प्रयत्न होता; पण, आता आमच्या आसोद्याच्या ओल्या मसाल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे. आमच्या मसाल्याची चव ही अस्सल खान्देशी आहे आणि तीच ग्राहकांना आवडते. यामुळे केवळ आमच्याच नाही, तर गावातील अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. आम्हाला आनंद आहे की, बहिणाबाईंच्या माहेरची ही खास चव आम्ही घराघरांत पोहोचवू शकलो.
- संदीप नारखेडे, मसाले विक्रेते, आसोदा, ता. जळगाव