गडचिरोली : हिरवळीची खत पिके ही जमिनीत हेक्टरी साधारणतः ६० ते ८० किलोपर्यंत नत्र स्थिरीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने करीत असतात. चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा अनेक आपल्या शेतात बोरू पिकाची लागवड केली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा अनेक तालुक्यात बोरू पिकाचे लागवड क्षेत्र वाढले आहे. शेणखताची उपलब्धता कमी होत असून, शेतीमध्ये वापरण्याचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी बोरूपिकाकडे वळले आहेत.
बोरू पीक शेतजमिनीत गाडण्याची योग्य वेळ
हिरवळीचे पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे. बहुतेक हिरवळीची पिके ही ६ ते ८ आठवड्यांत फुलोऱ्यात येतात. या अवस्थेत सनहॅपसारखे पीक जमिनीत गाडल्यास नत्राचे स्थिरीकरण अधिक होते. परिणामी, त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या गहू पिकाच्या उत्पादनात १२ ते २५ टक्क्यांनी वाढ होते, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले.
बोरू (ताग) एक उत्तम हिरवळीचे पीक आहे. रब्बी हंगामात हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे फेकून पेरणी करावी लागते. पीक फुलोऱ्यावर आल्यावर नांगराने जमिनीत गाडून टाकावे, जमिनीची सुपीकता वाढते, नत्राचे प्रमाण सुधारते.
- बी. जी. कोहचाडे, सहायक कृषी अधिकारी, भेंडाळा
शेतीचा पोत टिकवून ठेवण्यासाठी मी शेतात बोरूची लागवड केली आहे. या हिरवळीच्या खतामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होतो.
- धनराज बुरे, मुरखळा माल (चामोर्शी)
