Summer Crop : अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील भुईमूग, ज्वारी, मूग आणि तीळ पिकांचे मोठे नुकसान केले आहे.(Summer Crop)
हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा (Unseasonal Rains) इशारा दिला आहे, त्यामुळे शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे उत्पादनात घट आणि बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींना जबर फटका बसला आहे. (Summer Crop)
यवतमाळ जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १४ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे उन्हाळी पिकांवर संक्रांत ओढवली आहे. भुईमूग, ज्वारी, मूग आणि तीळ या पिकांची काढणी सुरु असतानाच पावसाच्या सततच्या सरींनी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनात घट, मजुरांचा अभाव, आणि बाजारात दर घसरणीमुळे आर्थिक संकट ओढावले आहे.
पावसाचा पिकांवर परिणाम
* मागील वर्षी चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पीक नियोजन केले. मात्र, काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांवर पावसाने हजेरी लावल्यामुळे ज्वारी काळवंडत आहे, मूगाच्या शेंगा सडू लागल्या आहेत, तर तिळाच्या कोथळ्यांना ओलावा बसल्याने उत्पादन धोक्यात आहे.
* शेतकऱ्यांकडून काढणीचे काम वेळेत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण मजुरांची टंचाई अधिकच अडचणीत भर घालते आहे.
भुईमूग उत्पादकांच्या चिंतेत भर
* लाखनवाडा खुर्द, जयरामगड, शिर्ला नेमाने, पिंप्री धनगर परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भुईमूग लागवड केली होती. मात्र यंदा हवामानातील अनियमितता, कीड आणि रोगांमुळे उत्पादन घटले. याशिवाय बाजारात दर घसरल्यामुळे केलेल्या खर्चाचीही भरपाई होत नाही.
* एका बॅगसाठी ७-८ हजार रुपये मजुरी खर्च येतो, त्याशिवाय बियाणे, खते, मशागत यावर मोठा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
* उत्पादनात लक्षणीय घट
* बाजारभावात मोठी घसरण
* मजुरी आणि निविष्ठांचा खर्च वाढला
* एका बॅगसाठी ७–८ हजार रुपयांचा खर्च
* कर्ज व उधारीतून पिक घेतले पण परतफेडीची चिंता
* खरीप हंगामासाठी भांडवल उभे करणेही कठीण
हवामान विभागाचा अलर्ट
* हवामान विभागाने पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
* जिल्हा प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे सुरु करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाची योग्य दखल घेऊन त्यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून योग्य ते पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाची नोंद (मिमीमध्ये)
तालुका | पावसाची नोंद (मिमी) |
---|---|
झरी | ३७ |
केळापूर | २७ |
घाटंजी | २१ |
वणी | १९ |
मारेगाव | १९ |
राळेगाव | १४ |
नेर | १४ |
बाभुळगाव | १३ |
कळंब | १३ |
यवतमाळ | १२ |
आर्णी | ९ |
दारव्हा | ८ |
पुसद | १० |
दिग्रस | ६ |
उमरखेड | ५ |
महागाव | २ |