बेळगाव : कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य हमीभाव मिळावा, यासाठी छेडलेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. या आंदोलनामुळे केवळ साखर कारखानेच नाहीत तर अनेक महामार्ग व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद पडली आहेत. उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये इतका हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३२०० रुपये भाव देण्याचा प्रस्ताव आंदोलकांसमोर ठेवला होता. मात्र, शेतकऱ्यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या आंदोलनामुळे २६ कारखान्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपेय भाव मिळावा, यावर आंदोलक ठाम आहेत. शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आल्याने मुदलगी येथील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती.
उसाला राज्य सल्लागार किंमत (एसएपी) मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरु झाले होते. मात्र, हे आंदोलन आता अथनी, चिक्कोडी, हुक्केरी, बैलहोंगल, मुदलगी, गोकाकसह शेजारच्या भागात पसरले असून, या क्षेत्रातील वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.
कर्नाटक राज्यात उसाला महाराष्ट्राच्या तुलनेत कमी भाव दिला जातो. त्यामुळे महाराष्ट्राच्या धर्तीवर राज्यातील ऊस उत्पादकांना भाव द्यावा, अशी मागणी या आंदोलकांकडून केली जात आहे.
