तारेख शेख
कायगाव परिसरात यंदा ऊस गाळप हंगामाची जोरदार लगबग पाहायला मिळत आहे.ऊसतोड मजूर, वाहतूकदार आणि कारखान्यांचे प्रतिनिधी यामुळे ग्रामीण भागात वर्दळ वाढली आहे. (Sugarcane Crushing)
यावर्षीचा ऊस गाळप हंगाम जरी १ नोव्हेंबरपासून सुरू झाला असला, तरी पावसाच्या व्यत्ययामुळे पुढील १५ दिवस तरी तो पूर्ण जोमात येण्याची शक्यता कमी दिसते. तरीदेखील कायगाव परिसरात ऊसतोड मजूर, वाहतूक कंत्राटदार आणि साखर कारखान्यांची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरातील अंदाजे ५ लाख मेट्रिक टन ऊसासाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील सुमारे १८ ते २० कारखान्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
वाहतुकीची सोय आणि वाढलेले क्षेत्र
कायगाव परिसरातील बहुतांश गावे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने ऊसतोडणी व वाहतुकीची सोय उत्तम आहे.
याच कारणामुळे गेल्या काही वर्षांत परिसरातील उसाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस मिळवण्यासाठी अनेक साखर कारखाने आपली कार्यालये थाटून 'ऊस मिळविण्याची मोहीम' हाती घेतात.
परिसरातील गाळपात उतरलेले कारखाने
सध्या कायगाव परिसरात
पंचगंगा शुगर मिल्स (महालगाव-वैजापूर)
मुक्तेश्वर शुगर (धामोरी-गंगापूर)
भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (संगमनेर)
अशोकनगर सहकारी (श्रीरामपूर)
जयहिंद शुगर (गंगापूर)
या कारखान्यांची ऊसतोड सुरू झाली आहे.
तर येत्या काही दिवसांत बारामती अॅग्रो (कन्नड), गंगामाई (शेवगाव), कोळपेवाडी (कोपरगाव), संजीवनी (कोपरगाव), ज्ञानेश्वर (भेंडा) आणि छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना (चित्ते पिंपळगाव) हे कारखाने ऊस मिळविण्यासाठी स्पर्धेत उतरतील.
ऊसतोड कामगारांची लगबग
कायगाव, जुने कायगाव, लखमापूर, अंमळनेर, गणेशवाडी, पखोरा, भेंडाळा, थनगरपट्टी, आयात, विधाने, गळविटर या गावांमध्ये सध्या ऊसतोडणीला सुरुवात झाली आहे.
पावसाचा अडथळा असला तरी ऊसतोड मजूर व ट्रॅक्टर-ट्रॉली चालकांनी गावे गाठली आहेत. सध्याच्या स्थितीत परिसरातून सुमारे पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी तयार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पावसामुळे हंगाम लांबणार?
सतत पडणाऱ्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी ऊसतोडणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून हंगामाचा पूर्ण वेग नोव्हेंबरच्या उत्तरार्धात किंवा डिसेंबरच्या सुरुवातीस अपेक्षित आहे.
चांगल्या पावसामुळे ऊसाची वाढ उत्तम झाल्याने साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Crushing Season : बॉयलर पेटले... ऊस शेतकरी सज्ज! यंदा गळीत हंगाम लवकर
