पुणे : एकीकडे यंदाचा ऊस गाळप हंगाम उशिराने सुरू होऊनही साखर उत्पादन वेगाने वाढत आहे. मात्र त्याचवेळी हंगामाच्या सुरुवातीला कारखाना स्तरावरील ३ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल असणाऱ्या साखरेच्या दरामध्ये सुमारे ३०० रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे पेट्रोलमधील इथेनॉलच्या मिश्रणाचा साखर कारखान्यांना मिळणारा वाटा ९० टक्क्यांवरून थेट ३० टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
चालू गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेच्या दरात तब्बल तीनशे रुपयांची घट झाल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करावा, तसेच इथेनॉलचा विक्री दर वाढवावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इथेनॉलचे विक्री दरही गेल्या तीन वर्षापासून स्थिर आहेत. या दोन प्रमुख स्रोतांमधूनच कारखान्यांना महसूल मिळत असून, अपुऱ्या महसुलामधून शेतकऱ्यांना ऊस गाळपाला दिल्यापासून १४ दिवसांत उसाचे पेमेंट (एफआरपी) करणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.
धान्य आधारित डिस्टिलरीजसह इथेनॉल उत्पादन क्षमता आता १ हजार ९०० कोटी लिटरहून अधिक झाली आहे. त्यात साखर उद्योगाची क्षमता ११०० कोटी लिटर इतकी आहे. यंदा केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी १ हजार ५० कोटी लिटरची निविदा काढली आहे. तेल कंपन्या हे इथेनॉल धान्य डिस्टिलरी व साखर कारखान्यांकडून विकत घेतील.
मात्र, गेल्या ३ ते ४ वर्षापासून विक्री करण्यात येणाऱ्या एकूण इथेनॉलमध्ये साखर कारखान्यांच्या इथेनॉलचे प्रमाण ९० टक्क्यांवरून घसरून थेट ३० टक्क्यांपर्यंत आले आहे. यंदा देशातील साखर कारखाने ३५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवणार आहेत. एकूण विक्रीस परवानगी मिळालेल्या इथेनॉलच्या ३० टक्क्यांनुसार या साखरेतून २८९ कोटी लिटरची विक्री साखर कारखाने करू शकणार आहेत, यामुळे केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.
निर्यातीपैकी ३ लाख टनांचे झाले करार
केंद्राने यंदा १५ लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली, पैकी आतापर्यंत केवळ ३ लाख टनांचे करार झाले आहेत. यातून ५० ते ६० हजार टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. असे असूनही देशांतर्गत साखरेचे सरासरी भाव आणखी घसरून सुमारे ३६ रुपये प्रति किलो झाले आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हे दर ३५ रुपयांपर्यंत घसरले. हंगामाच्या सुरुवातीला हे दर ३८ रुपयांपर्यंत होते. सध्याचे आंतरराष्ट्रीय साखरेचे भाव ४१० ते ४३० डॉलर प्रति टन (एफओबी) असे असून, ते परवडणारे नाहीत. मात्र, जानेवारी-मार्चमध्ये ब्राझीलची निर्यात मर्यादित असल्याने चांगल्या निर्यातीची संधी मिळेल.
