Success Story : मातीशी नाळ जुळलेली, शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली जिद्द, मेहनत आणि अभ्यासाची ताकद जेव्हा जागतिक स्तरावर दखल घेण्याजोगे संशोधन घडवते, तेव्हा तो केवळ व्यक्तीगत यशाचा नाही तर संपूर्ण गाव, परिसर आणि समाजाचा अभिमान ठरतो.(Success Story)
इटकूर (ता. कळंब) येथील डॉ. हनुमंत पांडुरंग गंभिरे यांची यशकथा अशीच प्रेरणादायी ठरत असून, औषधनिर्मिती संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी पंजाब विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टरेट (PhD)' प्रदान करून सन्मानित केले आहे.(Success Story)
कष्टकरी शेतकरी पांडुरंग साहेबराव गंभिरे यांचे पुत्र असलेले हनुमंत गंभिरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. औषधनिर्माण शास्त्रातील शिक्षण घेतल्यानंतर केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता त्यांनी स्वतःला फार्मास्युटिकल रिसर्च या क्षेत्रात पूर्णतः झोकून दिले. आज ते देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर औषधनिर्मिती संशोधनातील एक दखलपात्र नाव म्हणून ओळखले जात आहेत.(Success Story)
१२व्या दीक्षांत समारंभात पीएचडी प्रदान
पंजाब युनिव्हर्सिटीच्या १२व्या वार्षिक दीक्षांत समारंभात डॉ. हनुमंत गंभिरे यांना 'फार्मास्युटिकल रिसर्च' विषयातील सखोल आणि उपयुक्त संशोधनासाठी पीएचडी प्रदान करण्यात आली.
या वेळी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मेरी एलिझाबेथ ट्रस यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी, 'भारतीय संशोधक जागतिक नियामक प्रणाली समजून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकत आहेत,' असे गौरवोद्गार काढले.
तर मेरी एलिझाबेथ ट्रस यांनी फार्मास्युटिकल संशोधन हे जागतिक आरोग्यासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे सांगत डॉ. गंभिरेंच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
युएस-एफडीए नियमांवर सखोल संशोधन
डॉ. गंभिरे यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील जागतिक नियमावली, विशेषतः अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (US-FDA) लागू केलेल्या निकषांवर सखोल संशोधन केले आहे.
गेल्या १४ वर्षांत विविध औषध कंपन्यांना देण्यात आलेल्या १२० चेतावणी पत्रांचा (Warning Letters) त्यांनी अभ्यास व विश्लेषण केले आहे.
या संशोधनातून निर्जंतुक औषधनिर्मिती प्रक्रियेत आढळणाऱ्या गंभीर त्रुटी, गुणवत्ता नियंत्रणातील कमतरता, प्रक्रिया व्यवस्थापन व दस्तऐवजीकरणातील उणिवा यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
तसेच 'ॲसेप्टिक कंट्रोल' आणि 'एन्व्हायर्नमेंटल मॉनिटरिंग' या संकल्पनांवर आधारित स्वतंत्र विश्लेषण सादर करण्यात आले आहे.
भारतीय औषध उद्योगाची जागतिक विश्वासार्हता वाढविणारे संशोधन
कोविड-१९ नंतर औषध व लस उत्पादनात निर्माण झालेल्या गुणवत्ता आव्हानांवर उपाय सुचविणारे संशोधनही डॉ. गंभिरे यांनी केले आहे. या संशोधनामुळे भारतीय फार्मास्युटिकल उद्योगाची जागतिक पातळीवरील विश्वासार्हता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शेतकऱ्याच्या घरातून निघून औषधनिर्मितीच्या जागतिक संशोधनापर्यंतचा डॉ. हनुमंत गंभिरे यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते एक आदर्श उदाहरण बनले आहेत.
