नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपीट या आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक क्रॉप कव्हरचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या घटकावर प्रतिक्रॉप कव्हरसाठी द्राक्ष बागांना प्रती १ एकरच्या मर्यादेत रु. ४.८१ लाख खर्च असून २.४१ लाख अनुदान देय आहे.
सध्या या योजनेत वाय आकाराच्या द्राक्ष बाग सांगाड्यालाच अनुदान दिले जाते. मात्र टी आकाराच्या सांगाड्याचादेखील समावेश करावा, अशी मागणी द्राक्ष उत्पादक व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून होत आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानचे अशोक किरनळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीने चांदवड, सटाणा व दिंडोरी तालुक्यातील क्रॉप कव्हर केलेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनास प्रोत्साहन मिळेल
राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी अनुदानाची क्षेत्र मर्यादा प्रतिलाभार्थी एकरवरून हेक्टरपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली. यामुळे अधिकाधिक द्राक्ष बागांचे संरक्षण होऊन निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनास प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी ओझर येथे द्राक्ष बागायतदार संघाची भेट घेऊन त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या.
