Join us
Daily Top 2Weekly Top 5

Strawberry Farming : विदर्भात स्ट्रॉबेरी शेतकरी कमी का? काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:07 IST

Strawberry Farming : चिखलदऱ्यातील चवदार स्ट्रॉबेरी आता अमरावती ते नागपूरपर्यंत लोकप्रिय होत आहे. थंड हवामान, लागवड पद्धत आणि कमी पाण्यातही उत्तम उत्पादन देणाऱ्या या स्ट्रॉबेरीमुळे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत नफा मिळतो. तरीही सरकारकडून मिळणारे ५० हजारांचे अनुदान बंद झाल्याने उत्पादकांची संख्या झपाट्याने घटली आहे. (Strawberry Farming)

नरेंद्र जावरे 

महाबळेश्वरची ओळख असलेली स्ट्रॉबेरी आता चिखलदऱ्याच्या डोंगरदऱ्यातही आपली वेगळी चव जपण्यात यशस्वी ठरत आहे. परतवाडा, अमरावती, अकोला, यवतमाळ ते नागपूरपर्यंत या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असून पर्यटक तिची खास चव आवडीने चाखत आहेत.  (Strawberry Farming)

मात्र, शासनाने मिळणारे ५० हजारांचे अनुदान बंद केल्याने पूर्वी ५० पर्यंत असलेले उत्पादक आता बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत.(Strawberry Farming)

शेतकऱ्यांसाठी नव्या उत्पन्नाचे दार

चिखलदरा पर्यटनस्थळ परिसरातील मोथा, आलाडोह, आमझरी, शहापूर, मसोंडी, खटकाली, सलोना या गावांमधील शेतकरी अनेक वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत होते. या स्ट्रॉबेरीची नैसर्गिक गोडी आणि सुगंध पर्यटकांना इतके आकर्षित करतात की हंगामात दररोज मोठ्या प्रमाणावर विक्री होते. (Strawberry Farming)

पूर्वी ५० हून अधिक शेतकरी ही शेती करत होते. मात्र, सध्या फक्त मोथ्यातील साधुराम पाटील, गजानन पाटील, गजानन शनवारे, खटकलीतील राधे भैया, आलाडोह येथील मारुती खडके आणि नारायण खडके अशी मोजकीच नावे स्ट्रॉबेरी उत्पादनात दिसतात.(Strawberry Farming)

कमी पाण्यात जास्त उत्पन्न

महाबळेश्वरजवळील वाई भागातून प्रति रोप १४ रुपयांनी दर्जेदार रोपे आणली जातात. एका एकरासाठी जवळपास २२ हजार रोपांची गरज भासते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झिगझॅग पद्धतीने, एक फूट अंतरावर लागवड केली जाते.

स्ट्रॉबेरी कमी पाण्यातही उत्तम वाढते आणि थंड हवामानात फुलोरा व फळधारणा उत्कृष्ट होते. त्यामुळे चिखलदऱ्याचे हवामान स्ट्रॉबेरीसाठी अत्यंत अनुकूल मानले जाते.

तीन लाखांचा नफा; तरीही शेतकरी कमी का?

एकरी लागवडीचा खर्च जवळपास ३ लाख रुपये येतो. हा खर्च जास्त असला तरी, ४५ दिवसांनंतर नोव्हेंबरच्या अखेरपासून मार्चपर्यंत तीन महिने सलग उत्पादन मिळते. दररोज ३० ते ४० किलो स्ट्रॉबेरी निघते. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांपर्यंत नफा मिळू शकतो.

बाजारभाव काय?

पावकिलो – १०० ते १२० रुपये

किलो – ५०० रुपये

जास्त उत्पादन झाल्यास स्ट्रॉबेरी परतवाडा ते नागपूरपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाठवली जाते. स्थानिक बाजारातही या फळाची मागणी कायम राहते.

पर्यटकांची पहिली पसंती

चिखलदरा पर्यटनस्थळामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी कायम असते. ताजी स्ट्रॉबेरीची वेगळी, नैसर्गिक चव त्यांना आवडते. त्यामुळे दररोजचा विक्रीतून शेतकऱ्यांना थेट रोख उत्पन्न मिळतं.

अनुदान बंदीचा मोठा परिणाम

पूर्वी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी शासनाकडून ५० हजार रुपये अनुदान मिळत होते. हे अनुदान बंद झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना लागवडीचा मोठा खर्च पेलणे कठीण झाले. परिणामी, स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वर्षागणिक कमी होत गेली.

मागणी वाढली… उत्पादक घटले

एकीकडे विदर्भात स्ट्रॉबेरीची मागणी कमालीची वाढली असताना, दुसरीकडे उत्पादन कमी होत असल्याने बाजारात स्थिर पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. योग्य योजना, थोडेसे भांडवल साहाय्य आणि तंत्रज्ञान आधारित मार्गदर्शन मिळाले तर चिखलदरा स्ट्रॉबेरी संपूर्ण विदर्भात मोठी ओळख निर्माण करू शकते.

वेगळी चव असल्याने पर्यटक आवडीने विकत घेतात. जास्त उत्पादन झाल्यास परतवाडा ते नागपूरपर्यंत पाठवितो. परंतु शासनाने अनुदान बंद केल्याने अनेक शेतकरी उत्पन्न घेत नाहीत. - साधुराम पाटील, स्ट्रॉबेरी उत्पादक, मोथा

हे ही वाचा सविस्तर : PMFME Scheme: 'पीएमएफएमई' योजनेत पाटणा अव्वल; संभाजीनगरची कामगिरी का घसरली?

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha's Strawberry Demand High, But Producers Few Due to Subsidy Cuts

Web Summary : Chikhaldara's strawberry farming, once flourishing, faces decline. Reduced government subsidies have decreased the number of farmers despite good demand in Vidarbha. High production costs and lack of support hinder growth, impacting local employment and potential profits.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफळेविदर्भ