Soybean Storage Cluster : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सोयाबीन आणि इतर शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी लातूरमध्ये 'सोयाबीन साठवण क्लस्टर' (Soybean Storage Cluster) प्रकल्प उभारण्यात येत आहे.
सायलो तंत्रज्ञान, डिजिटल साठवण आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या आधुनिक सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवण अधिक सुरक्षित व आधुनिक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत 'सोयाबीन साठवण क्लस्टर' (Soybean Storage Cluster) प्रकल्प उभारण्यात येत आहे.
याअंतर्गत १० हजार मेट्रिक टन क्षमतेचा सायलो प्रकल्प लातूर एमआयडीसीत, ३ हजार मेट्रिक टन क्षमतेचे नवीन वखार पानगावात, तर १,२०० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम चापोली येथे उभारले जात आहे.
२०२४ मध्ये नाफेडच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची खरेदी झाली होती. या खरेदीचा साठा पारंपरिक गोदामे आणि भाडे तत्वावरील वखारींमधून केला गेला. परंतु साठवण क्षमतेची मर्यादा असल्याने शाश्वत आणि दीर्घकालीन उपाय म्हणून सायलो व डिजिटल वखारींचा निर्णय घेतला गेला.
साठवणूक नियोजन वखार महामंडळाने स्वमालकीच्या आणि दुप्पट क्षमतेने भाड्याच्या गोदामांद्वारे यशस्वीपणे पार पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळाला. मात्र, पारंपरिक गोदामांच्या मर्यादित क्षमतेमुळे आधुनिक साठवण सुविधांची गरज निर्माण झाली आहे.
काय आहे प्रकल्पाची वैशिष्ट्ये?
* अत्याधुनिक सायलो तंत्रज्ञान
* शेतमालाची गुणवत्ता टिकवणारी डिजिटल साठवण प्रणाली
* वखार पावती आधारित कर्ज सुविधा
* उत्तम दर मिळेपर्यंत माल साठवण्याची हमी
विकास प्रक्रियेला गती
९ मे रोजी राज्यस्तरीय आढावा बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले. वखार महामंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी १० मे रोजी स्थळभेट घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांची गरज ओळखून आधुनिक सुविधा असलेला प्रकल्प लातूरमध्ये उभारला जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी थेट लाभ
* या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल साठवण्यासाठी सुरक्षित पर्याय, गुणवत्तेची खात्री, वेळेवर भांडवल आणि भाव मिळेपर्यंत साठवण सुविधा मिळणार आहे.
* लातूर जिल्हा राज्यातील प्रमुख अन्नधान्य साठवण हब म्हणून उदयास येणार आहे, असा विश्वास वखार महामंडळाने व्यक्त केला आहे.