Soybean Procurement Payment : वाशिम जिल्ह्यात 'नाफेड'मार्फत सुरू असलेल्या शासकीय सोयाबीन खरेदी मोहिमेला समाधानकारक प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल २ लाख ७२ हजार ९५६ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण करण्यात आली आहे. (Soybean Procurement Payment)
जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रांवर प्रतिक्विंटल ५ हजार ३२८ रुपये या हमीभावाने ही खरेदी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या सोयाबीनच्या मोबदल्यापोटी जानेवारी अखेरपर्यंत १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चुकारे थेट जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.(Soybean Procurement Payment)
यंदा खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीत शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र, हमीभावावर होणारी शासकीय खरेदी ही शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरत आहे.
हमीभावामुळे शेतकऱ्यांना दिलासा
प्रतिक्विंटल ५ हजार ३२८ रुपये हमीभाव निश्चित झाल्याने शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्च तरी निघत असल्याची भावना व्यक्त होत आहे. खुल्या बाजारातील कमी दरांच्या तुलनेत नाफेड खरेदी अधिक फायदेशीर ठरत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे कल वाढताना दिसून येत आहे.
१५ खरेदी केंद्रांवर पारदर्शक प्रक्रिया
वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत एकूण १५ सोयाबीन खरेदी केंद्रे कार्यरत असून, तालुकानिहाय खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून थेट खरेदी केंद्रांवर सोयाबीनची विक्री केल्याने दलालांपासून सुटका झाली आहे. केंद्रांवर वजन, गुणवत्ता तपासणी आणि नोंदणी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
चुकारे थेट खात्यात
नाफेडमार्फत खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. ३ जानेवारीअखेर ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्यात आले असून, उर्वरित नोंदणीकृत व पात्र शेतकऱ्यांचे देयक टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. थेट खात्यात रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
जिल्ह्यातील सर्व पात्र व नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी नियमानुसार करण्यात येत असून, चुकारे वेळेत देण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अडचण असल्यास संबंधित खरेदी केंद्र किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा. - गीतेश साबळे, जिल्हा उपनिबंधक, वाशिम
