Soybean Pest Attack : बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात हुमणी अळीने शेतकऱ्यांचा अक्षरशः धसका घेतला. सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होऊन तब्बल १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. (Soybean Pest Attack)
यात ३३ हजार ५१४ शेतकरी बाधित झाले असून, प्रशासनाने २४ सप्टेंबर रोजी अंतिम अहवाल शासनाकडे पाठवूनही अद्याप नुकसानभरपाईबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी, बाधित शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.(Soybean Pest Attack)
सोयाबीन पिकावर सर्वाधिक फटका
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, १२,९९२.७९ हेक्टर क्षेत्र हुमणी अळीच्या प्रादुर्भावाखाली आले आहे. यातील १२ लाख ९३६.६८ हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाचे असून, सर्वाधिक नुकसान याच पिकाचे झाले आहे.
तसेच मका ५३.८२ हेक्टर, आणि तूर व उडीद मिळून २.२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला असून, खरीप हंगामातील नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
तालुकावार नुकसान तपशील
हुमणी अळीने सर्वाधिक फटका चिखली तालुक्याला बसला असून, येथे ३ हजार १६७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत व १० हजार ४५ शेतकरी प्रभावित झाले आहेत.
त्यानंतर मोताळा तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, २ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर ५ हजार ७१३ शेतकरी बाधित आहेत. नांदुरा (२,३३९ हेक्टर), बुलढाणा (१,२०३ हेक्टर) व खामगाव (१,१३८ हेक्टर) या तालुक्यांतही मोठे नुकसान झाले आहे. तसेच मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, संग्रामपूर व मेहकर या तालुक्यांतही अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.
पंचनामे झाले, पण मदत कुठे?
शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळू लागली असली, तरी हुमणी अळीग्रस्तांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हुमणी अळीमुळे सोयाबीन पिक काढून टाकावे लागले. पंचनामे झाले; पण अजून मदत मिळाली नाही.- योगेश सातव, शेतकरी, पिंपळगावराजा
हे ही वाचा सविस्तर : Rabi crop : मुबलक पाण्याचा फायदा; रब्बी हंगामात चिया-करडईच्या लागवडीला चालना
