Join us

Soyabean Market : हमीभावाने खरेदी केलेले सोयाबीन ग्रेडरकडून 'रिजेक्ट', काय आहे नेमकं प्रकरण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:08 IST

Soyabean Market : सदर सोयाबीन पुन्हा माघारी आल्याने या सोयाबीनचे काय करायचे, असा प्रश्न खरेदी विक्री संघासमोर उभा ठाकला आहे.

- शैलेश कर्पे  

नाशिक : सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाने शासकीय हमीभावाने (Soyabean Market) शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सोयाबीन वखार महामंडळाच्या गोडाऊनला नेल्यानंतर निरीक्षकाकडून सदर सोयाबीन खरेदी योग्य नसल्याचे सांगून रिजेक्ट करत पुन्हा माघारी धाडल्याने खरेदी- विक्री संघ व शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

'नाफेड' मार्फत काही एजन्सी (NAFED) नेमून शासकीय हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सहा ठिकाणी सदर केंद्र सुरू आहेत. सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाकडूनही वीस दिवसांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून करार करून तालुक्यातील वावी येथे शासकीय हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र (Soyabean Buying Center) सुरू करण्यात आले होते, या वीस दिवसांत सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाने ८७ शेतकऱ्यांकडून १३३४ क्विंटल सोयाबीन ४८९२ रुपये दराने खरेदी केले आहे. 

या खरेदी केलेल्या सोयाबीनपैकी पहिली १२ टनांची मालट्रक सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाने मुसळगाव येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनला पाठवली होती. या ठिकाणी 'एनसीसीएफ' संस्थेच्या निरीक्षकाने (ग्रेडर) आलेल्या सोयाबीन मालाची तपासणी केली. या मालास चाळणी लावत त्यातील खडे काढले. सदर सोयाबीनचा माल 'एनसीसीएफ' संस्थेच्या निरीक्षकाने खरेदीयोग्य नसल्याचे सांगत सोयाबीन पुन्हा खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनला घेऊन जाण्यास सांगितले. शासकीय हमीभाव दराने आपला सोयाबीन माल विकला गेल्याची शेतकऱ्यांची भावना होती. 

सदर सोयाबीन पुन्हा माघारी आल्याने या सोयाबीनचे काय करायचे, असा प्रश्न खरेदी विक्री संघासमोर उभा ठाकला आहे. एक तर सदर सोयाबीन शेतकऱ्यांना पुन्हा देण्याची वेळ येऊ शकते किंवा सोयाबीन खडा-माती व कीड काढून पुन्हा पाठवावे लागणार आहे. अगोदरच सोयाबीन घेण्यासाठी हमाली तो तोलाई, गाडी भाडे खरेदी-विक्री संघाला खर्च करावे लागले आहे. त्यात सोयाबीन माल रिजेक्ट झाल्याने त्याचे काय करावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

खरेदी-विक्री संघाकडून हमीभावाने खरेदी बंद अगोदर खरेदी केलेला सोयाबीनचा माल रिजेक्ट होऊन पुन्हा गोडाऊनला आल्याने सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघ अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खरेदी-विक्री संघाने दोन दिवसांपासून हमीभावाने सोयाबीन खरेदीचे काम बंद केले आहे.

शेतकऱ्यांच्या पैशांचे काय? शासकीय दराने सोयाबीन खरेदी-विक्री केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आपला सोयाबीनचा माल सिन्नर तालुका खरेदी- विक्री संघाकडे दिला. खरेदी-विक्री संघाने एनसीसीएफ संस्थेला सदर माल पाठविल्यानंतर त्यांनी तो रिजेक्ट केला. शेतकऱ्यांना या सोयाबीनचे पैसे पंधरा दिवसांत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, आता सदर सोयाबीन पुन्हा खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनला आल्याने पैसे केव्हा मिळतील किंवा सोयाबीन परत घेऊन जावे लागते काय, असा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या केंद्राकडून खरेदी केलेले सोयाबीन परत पाठविल्याची तक्रार आली आहे. याबाबत आज शुक्रवारी सायंकाळी संबंधित कंपनीचे अधिकारी, जिल्हा व तालुका कृषी अधिकारी, खरेदी केंद्राचे प्रतिनिधी यांची तातडीने बैठक आयोजित केली आहे. यात मार्ग काढण्यात येईल. - माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाकडून आलेले शेतकयांचे सोयाबीन खरेदीयोग्य नसल्याने ते पुन्हा पाठविण्यात आले. कंपनीने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सोयाबीन खरेदी करता आली नाही. काही जुने सोयाबीन त्यात होते. - कृष्णा पांडे, निरीक्षक, एनसीसीएफ संस्था

शेतक-यांकडून आलेले सोयाबीन वखार महामंडळाच्या गोडाऊनला पाठवण्यात आलेले होते. मात्र, ग्रेडरकडून अतिशय कडक नियमावली व चाळण लावण्यात आली. याबाबत तहसीलदार व अधिकायांनी बैठक घेऊन मार्ग काढावा. - नितीन आव्हाड, चेअरमन, सिन्नर तालुका खरेदी विक्री संघ

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रकृषी योजनाबाजारमार्केट यार्डनाशिक