रूपेश उत्तरवार
दीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यात नाफेडमार्फत सोयाबीनच्या हमीखरेदीची प्रक्रिया अखेर सुरू झाली. यासाठी राज्यभरात मंजूर ४७७ पैकी ३६७ केंद्रांना कामकाजाची परवानगी देण्यात आली. (Soybean Kharedi)
तर सोयाबीन विक्रीसाठी तब्बल १ लाख ८६ हजार ९०४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पहिल्या दिवशी केंद्रांवर मोठी गर्दी होईल असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात केवळ ५८ शेतकरी हजर झाल्याने प्रशासन, व्यापारी आणि नाफेड अधिकारी अवाक् झाले.(Soybean Kharedi)
खुल्या बाजारात दर जास्त
खुल्या बाजारात सध्या सामान्य सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ८००, तर चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ५ हजार ५०० ते ७ हजार ७०० प्रतिक्विंटल दर मिळतो आहे. त्याच्या तुलनेत हमी केंद्राचा दर ५ हजार ३२८ रुपये निश्चित आहे.
यामुळे अनेक शेतकरी सध्या बाजार भाव वाढण्याची वाट पाहत आहेत. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची कमतरता असून, त्यामुळे दर आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
ऑनलाइन प्रक्रिया व अडचणींमुळे केंद्रांवर कमी प्रतिसाद
हमी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी
पीकपेरा ७/१२ नोंद
आधार आधारित अंगठा प्रमाणीकरण
वेळेनुसार बोलावणी
या सर्व प्रक्रिया अनिवार्य आहेत.
ग्रामीण भागात इंटरनेट, अॅप वापर आणि प्रमाणीकरणाच्या अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांनी हमी केंद्रांकडे जाणे टाळले आहे.
अनेक केंद्रांवर शेतकरी अनुपस्थित
पहिल्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील १ हजार ५९५ शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी 'एसएमएस'द्वारे परवानगी देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात फक्त ५८ शेतकरीच सोयाबीनसह हजर झाले. त्यामुळे अनेक खरेदी केंद्रांनी केवळ काटापूजन करून औपचारिकता पूर्ण केली.
या ५८ शेतकऱ्यांकडून एकूण १ हजार २६९ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.
केंद्रांची स्थिती : कुठे किती मंजूर?
राज्यात एकूण ४७७ हमी खरेदी केंद्रांना मंजुरी
विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन – ३२
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन – १६३
एमएसएमबी – २८१
नाफेड (प्रायोगिक) – १
यापैकी ३६७ केंद्र सक्रिय असून उर्वरित केंद्रे पुढील काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे.
बाजारभावातील अनिश्चितता
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन घटल्याने बाजारभाव वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकरी हमी केंद्रांवर सोयाबीन विकण्याऐवजी बाजारातील परिस्थिती अनुकूल होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
