Soybean Kharedi : वातावरणातील अनिश्चिततेचा थेट परिणाम आता सोयाबीन खरेदीवर दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील विविध हमीभाव केंद्रांवर सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू असली, तरी आर्द्रता वाढल्यामुळे व रंगबदलामुळे अनेक ठिकाणी वखारांकडून शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारले जात आहे.(Soybean Kharedi)
केंद्रावर दाखविलेली आर्द्रता दुसऱ्याच दिवशी वाढत असून, त्याचा थेट परिणाम हमीभाव खरेदीवर होत आहे.(Soybean Kharedi)
आर्द्रतेचा धक्का – ११.३ ते थेट १२.७
खरेदी केंद्रांवर तपासणीदरम्यान सोयाबीनची आर्द्रता ११.३% आढळत आहे. पण दुसऱ्याच दिवशी मोजणी करताना ती १२.७ टक्क्यांपर्यंत वाढते.
वखारचे नियम काय?
१२% पेक्षा अधिक हवा (आर्द्रता) असलेले सोयाबीन स्वीकारले जाणार नाही.
यामुळे केंद्रचालकांची पंचाईत तर शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. काही केंद्रांनी तर दहा क्विंटलपेक्षा जास्त खरेदी केलेले सोयाबीन परत पाठवल्याचे समोर आले आहे.
रंग बदलेला सोयाबीनही मोठी समस्या
या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अति पावसामुळे सोयाबीन दाण्यांचा रंग बदलण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
शेतकरी काय सांगतात?
* काही वाणांत परागीभवन वाढल्याने दाणे तपकिरी/काळसर
* फेडरेशनकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने केंद्रांवर गोंधळ
* गुणवत्ता तपासणीत हे दाणे नाकारले जात असल्याने नुकसान
फेडरेशनने तातडीने उपाययोजना करावी – शेतकऱ्यांचा सूर
वखारांकडून नकार मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, नियम शेतकऱ्यांच्या परिस्थितीनुसार सैल करावेत किंवा तात्पुरता पर्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
आठ दिवसांत तब्बल १० हजार क्विंटल खरेदी!
धाराशिव जिल्ह्यातील ३१ केंद्रांपैकी काही केंद्रे जोरात खरेदी करत आहेत. धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, चोराखळी, भूम, गुंजोटी यासह अनेक केंद्रांवर गेल्या आठ दिवसांत जवळपास १० हजार क्विंटल खरेदी झाली आहे.
परंतु काही महत्त्वाची केंद्रे जसे नळदुर्ग, वाशी, शिरढोण, ढोकी, तुळजापूर, टाकळी बेंबळी ही अद्याप बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
वातावरणातील बदलामुळे आर्द्रता वाढते आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पूर्णपणे वाळवून आणणे आवश्यक आहे. रंग बदल आणि जास्त हवेमुळे काही सोयाबीन वखाराने नाकारले आहेत.- दीपक शेलार, खरेदी केंद्र प्रमुख
या वर्षी अति पावसामुळे काही वाणांमध्ये परागीभवन वाढून दाण्यांचा रंग बदलला आहे. आर्द्रता दुसऱ्या दिवशी वाढते आहे. फेडरेशनने तातडीने नियमांमध्ये सवलत देवून शेतकऱ्यांची गैरसोय थांबवावी.- दादा माळी, शेतकरी
हे ही वाचा सविस्तर :Soybean Kharedi : नाफेड नोंदणी सुरू… पण सोयाबीन खरेदी कुठे अडली? वाचा सविस्तर
