Soybean Kharedi : शेतकऱ्यांनी नाफेडवर नोंदणी सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष खरेदी सुरू होण्यास विलंब होत आहे. (Soybean Kharedi)
अंगठा प्रमाणीकरणातील अडचणी, बारदाना टंचाई आणि खाजगी व्यापाऱ्यांचे कमी दर यामुळे शेतकरी मोठ्या प्रतीक्षेत आहेत. शासनाचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये असूनही शेतकऱ्यांना तो मिळत नसल्याने चिंता वाढली आहे.(Soybean Kharedi)
निवघा बाजार परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या संख्येने नाफेड केंद्रांवर सोयाबीन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्ष खरेदीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. नोंदणी झाली, मग खरेदी कधी? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. (Soybean Kharedi)
अंगठा प्रमाणीकरणामुळे वाढल्या अडचणी
या वर्षी नाफेड नोंदणीसाठी अंगठा प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनेक वृद्ध शेतकऱ्यांचे अंगठे मशीनवर वाचत नसल्याने नोंदणी अडखळत आहे.
निवघा बाजारातील ९ नाफेड केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असली, तरी आतापर्यंत फक्त ७८८ शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली आहे. मागील वर्षी येथे तब्बल ३ हजार ६०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती, यावर्षीची संख्या त्याच्या तुलनेत खूपच कमी आहे.
शेतकऱ्यांनी खरेदी सुरू होण्याबाबत
बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी सुरू करता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना काढलेले सोयाबीन घरीच ठेवावे लागते आहे. - जयवंत देशमुख, केंद्रचालक
खाजगी व्यापाऱ्यांचे मनमानी सुरु
शासनाचा सोयाबीनसाठी हमीभाव ५ हजार ३२८ रुपये आहे. मात्र, बाजारात खाजगी व्यापारी फक्त ४ हजार ते ४ हजार५०० रुपये या दराने माल खरेदी करत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल जवळपास १ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय खरेदी लवकर सुरू होण्याची निकड भासू लागली आहे.
खरेदी तत्काळ सुरू करा
खरेदीला विलंब, कमी नोंदणी आणि खाजगी व्यापाऱ्यांच्या कमी दरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांनी व स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाकडे तत्काळ नाफेड खरेदी सुरू करावी, बारदाना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
