बालाजी बिराजदार
लोहारा तालुक्यातील भातागळी येथे पार पडलेल्या सोयाबीनपीक कापणी प्रयोगातून हेक्टरमागे केवळ ४७ किलो उत्पादनाचा अंदाज निघाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने खरीप पिकांचे झालेले नुकसान आता प्रत्यक्ष प्रयोगांमधून स्पष्टपणे दिसू लागले आहे. (Soybean Crop Loss)
२४५ ग्रॅम उत्पादनावरून स्पष्ट झाले चित्र
शुक्रवारी भातागळी येथील शेतकरी शशिकांत दत्तोपंत कुलकर्णी यांच्या शेतात १०x५ मीटर क्षेत्रात हा प्रयोग घेण्यात आला. या क्षेत्रातून मिळालेल्या सोयाबीनचे वजन फक्त २४५ ग्रॅम निघाले. या आकडेवारीनुसार हेक्टरमागे उत्पादन केवळ ४७ किलो इतके राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हे पाहून उपस्थित अधिकारी आणि शेतकरी स्तब्ध झाले. कारण हे उत्पादन गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी ठरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एकूण ५०४ प्रयोगांची अंमलबजावणी
धाराशिव जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळांमध्ये एकूण ५०४ पीक कापणी प्रयोग राबविण्याचे नियोजन आहे. प्रत्येक महसूल मंडळात १२ प्रयोग केले जाणार असून, भातागळी येथील हा प्रयोग त्या मोहिमेतील एक भाग होता. या प्रयोगानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्र प्रक्रिया, व्हिडिओ चित्रीकरण, तसेच वजन मोजणी करण्यात आली.
अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित
या प्रयोगावेळी पीकविमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डचे प्रतिनिधी बी. एन. बागल, पीकविमा अभ्यासक अनिल जगताप, मंडळ कृषी अधिकारी एन.एन. मगर, उपकृषी अधिकारी जे.के. गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी के.एम. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी आर.आर. बोयने, तलाठी एम.जी. माळी, उपसरपंच हनुमंत जगताप कारभारी, तसेच अनेक स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
नुकसानभरपाईचे मूल्यांकन नव्या निकषांवर
२०२५ च्या खरीप हंगामातील पीक विमा योजनेअंतर्गत सध्या जिल्ह्यात हे प्रयोग सुरू आहेत. नव्या योजनेनुसार नुकसानभरपाईचे मूल्यांकन ५० टक्के पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आणि ५० टक्के उपग्रह छायाचित्रांवर आधारित असेल. म्हणून या वर्षीच्या प्रयोगांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हीच अपेक्षा
अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली अशी स्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पीकविमा नुकसानभरपाईतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. - अनिल जगताप, पीकविमा अभ्यासक