अभय लांजेवार
मराठवाडा व विदर्भासह राज्यभरात अतिपावसाने कहर केला आहे. आता तर उमरेड तालुक्यासह भिवापूर, कुही आणि परिसरातील शेतांमध्ये सोयाबीनच्या शेंगामधील दाण्यालाच अंकुर फुटू लागला आहे. (Soybean Crop Damage)
हे चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले आहे. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिके अक्षरशः उद्ध्वस्त होऊ लागली आहेत.(Soybean Crop Damage)
अतिवृष्टीने उद्ध्वस्त नियोजन
यंदा शेतकऱ्यांनी बी-बियाणे, औषधे, फवारणी, मजुरी या सगळ्यावर प्रचंड खर्च करून सोयाबीन, कापूस, धानाची लागवड केली. अनेकांनी बँका, तर काहींनी सावकार गाठून कर्ज काढले. मात्र, पावसाने आंतरमशागती आणि फवारणीचे काम करु दिले नाही. थोडी उसंत मिळाली तरी नंतरच्या मुसळधार पावसाने तीही संपवली.
अंकुर फुटल्याने उत्पादनावर प्रश्नचिन्ह
शेतातील सोयाबीन शेंगा भरल्याच नाहीत, आणि ज्या भरल्या त्यातले दाणे पावसामुळे अंकुर फुटून सडू लागले आहेत.
कापसाची वाढ खुंटली असून धानाच्या रोपांवरही प्रतिकूल परिणाम दिसत आहे.
पावसाचा जोर असाच राहिला तर शेतातली पिके पूर्णतः नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांचा संताप व मागणी
नदी, नाले, पुलालगतच्या शेतात तर आधीच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आता शेतातले पिके सडत चालली आहेत.
शेतकरी संतप्त होत म्हणतात, घरातील होता नव्हता तो पैसा लावला, पण पिकांचा घासच निसर्गाने हिरावला.
सरकार अजूनही गप्प बसले, तर ही आमची अग्निपरीक्षाच ठरेल. 'वाट कसली बघता, ओला दुष्काळ जाहीर करा!'
कृषी तज्ज्ञांच्या मते, जर हवामान सुधारले नाही तर यंदा सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट येईल. शेतकऱ्यांचा पिकांवरचा विश्वासच डळमळीत होईल. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची घोषणा करावी, अशी मागणी वेगाने वाढत आहे.