- विनायक येसेकर
चंद्रपूर : राज्यात ओला दुष्काळ, अनियमित पावसाळा आणि पूर यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. उत्पादन झालेल्या मालालाही बाजारात योग्य दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
कोंढा येथील शेतकरी प्रदीप श्रीराम डोंगे यांचे उदाहरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी चार एकर शेतीतसोयाबीन पिकवले. या पिकावर त्यांनी तब्बल ६४ हजार ८५० रुपये इतका खर्च केला. बियाणे, खत, कीटकनाशके, मशागत, फवारणी, मजुरी, ट्रान्सपोर्ट इत्यादी सर्व खर्च आटोपून जेव्हा उत्पादन हाती आले, तेव्हा बाजारात भाव मात्र फक्त १,६०० प्रतिक्विंटल एवढाच मिळाला.
एकूण ९.५० क्विंटल उत्पादन विकून डोंगे यांना फक्त १५ हजार ४० रुपये मिळाले, म्हणजेच त्यांच्या मेहनतीचा ४९ हजार ८१० रुपयांचा तोटा झाला. दरम्यान, शेतकऱ्यांकडून जे सोयाबीन विक्रीसाठी येत आहे ते अत्यंत खराब असल्यामुळे त्या सोयाबीन पिकाचा निकष काढून १६०० रुपये भाव ठरविण्यात आला आहे, असे गुरु गणेश इंड्रस्टीज, खंडाळा रिठ टाकळीच्या संचालकाचे म्हणणे आहे.
खर्चाचे सविस्तर गणित
- बियाणे : १२ हजार ८०० रुपये
- खत - ४ हजार ३५० रुपये
- कीटकनाशके व औषधे- २० हजार २०० रुपये
- हार्वेस्टर - १० हजार रुपये
- मशागत - ७ हजार २०० रु.
- पेरणी - ४ हजार रुपये
- फवारणी मजूर - ४८०० रु.
- ट्रान्सपोटिंग - १५०० रु.
- एकूण खर्च - ६४ हजार ८५० रुपये
सरकारची हमी फक्त कागदावरच!
राज्यात दरवर्षी शेतमालासाठी हमीभाव घोषित केला जातो. पण, तो प्रत्यक्ष व्यवहारात लागू होत नाही. व्यापारी कमी भाव सांगून शेतकऱ्यांचा माल घेतात आणि प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना बाजारातील भाव मात्र कोसळत आहेत. एका बाजूला नोकरदारवर्गाला भत्ते व वेतनश्रेणी वाढीचे गिफ्ट मिळते, तर दुसरीकडे अन्नदाता मात्र दरवर्षी तोट्यात जात आहे.
मला नफा तर सोडा, जवळपास ५० हजारांचा तोटा झाला. ना निसर्ग साथ देतो, ना सरकार. निसर्ग कोपला तर पिकंच होत नाही आणि पिकलं तरी व्यापारी लुटतात. नुसत्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही.
- प्रदीप डोंगे, शेतकरी, कोंढा (भद्रावती)
