बाबू खामकर
भूम (पाथरूड) : भूम तालुक्यातील जेजला येथे सुधारित ज्वारीच्या नावाखाली हायब्रीड बियाणे वाटप झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Sorghum Seed Issue)
रब्बी हंगामात पीक प्रात्यक्षिकासाठी देण्यात आलेले 'सुधारित' बियाणे प्रत्यक्षात हायब्रीड निघाल्याने उत्पादन घटले असून बाजारात योग्य दरही मिळत नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.(Sorghum Seed Issue)
भूम तालुका कृषी कार्यालयामार्फत जेजला येथील समाधान शेतकरी गटातील सुमारे २५ शेतकऱ्यांना 'महाबीज सुधारित ज्वारी – पीव्हीके १००९' या नावाने बियाणे देण्यात आले होते.
अधिक उत्पादन मिळेल, या विश्वासाने शेतकऱ्यांनी या बियाणाची पेरणी केली. मात्र पीक हाती आल्यानंतर ते सुधारित नसून हायब्रीड असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
उत्पादन घटले, भावही मिळेना
या ज्वारीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आले असून बाजारात त्याला साध्या ज्वारीइतकाही भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
व्यापारी हे धान्य खरेदी करण्यास टाळाटाळ करत असल्याने आर्थिक नुकसान वाढले आहे.
चाऱ्याचाही प्रश्न निर्माण
ग्रामीण भागात ज्वारी पिकाचे दाण्याइतकेच कडब्यालाही महत्त्व असते. मात्र या बियाणांपासून तयार झालेला कडबा निकृष्ट दर्जाचा असल्याने जनावरे तो खात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत
'आम्ही विश्वासाने शासकीय बियाणे पेरले, पण आमचा विश्वासघात झाला. सुधारित वाण सांगून हायब्रीड बियाणे देण्यात आले,' असा आरोप समाधान शेतकरी गटाचे अध्यक्ष दिलीप भोसले यांनी केला.
तर शेतकरी समाधान भोसले यांनी 'जनावरांसाठी कडबा मिळत नसल्याने अडचण वाढली आहे,' असे सांगितले.
चौकशीची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 'शासकीय बियाणे खात्रीशीर असते, या विश्वासाला तडा गेला आहे,' असे मीना भोसले यांनी सांगितले.
भूमचे कृषी अधिकारी अतुल ढवळे यांनी सांगितले की, महाबीजकडून प्राप्त झालेले बियाणेच वाटप करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांकडून हायब्रीड असल्याच्या तक्रारी आल्याने चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
या घटनेमुळे शासकीय बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
