संजय खासबागे
हिवाळ्याची चाहूल लागताच वऱ्हाड परिसरात स्वयंपाकघरांचा रंग बदलतो आणि चवीला देशी ठसा लाभतो. शेंदूरजनाघाटसह आसपासच्या ग्रामीण भागातील शेतशिवारात दुधमोगरा, लष्करी दाणे (चितरंगी), वाल, तुरीच्या शेंगा अशा हिवाळी पिकांनी बहर घेतला असून, वेलीवर लटकलेल्या शेंगा दाण्यांनी भरल्याचे दृश्य दिसून येत आहे. परिणामी, थंडीच्या दिवसांत सोले-वांग्याच्या भाजीची मेजवानी घराघरांत रंगू लागली आहे.(Solya Vangyachi Bhaji)
शेंदूरजनाघाट परिसरात खरीप-रब्बी पिकांच्या आंतरपीक म्हणून वालपाटा अर्थात एकजिनसी वालाच्या शेंगांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. (Solya Vangyachi Bhaji)
त्यामुळेच येथे 'आला थंडीचा महिना, सोले-वांग्याची भाजी खा' असे म्हणणे प्रचलित झाले आहे. हिवाळ्यात वालाच्या दाण्याची भाजी आणि गरमागरम भाकरी ही खवय्यांसाठी खास पर्वणी मानली जाते.
चार महिने मेहनत, हिवाळ्यात बाजारपेठ
शेतकरी खरीप पिकांसोबतच जुलै महिन्यात वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. त्यानंतर जवळपास चार महिने या पिकांची काळजी घेतली जाते. नोव्हेंबरअखेरीस वेलीवर तयार झालेल्या दुधमोगरा, लष्करी (चितरंगी), वाल व तुरीच्या शेंगा बाजारात येऊ लागतात. शेंदूरजनाघाटच्या आठवडी बाजारासह परिसरातील बाजारपेठा या भाज्यांनी सजून गेल्या आहेत.
गृहिणींना मोठा दिलासा
हिवाळ्यात हिरव्या ताज्या भाज्यांची आवक वाढल्याने गृहिणींनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तीन ते चार महिने 'आज भाजी कशाची करावी?' या प्रश्नातून मुक्ती मिळाल्याचे गृहिणी सांगतात.
घराघरांत रोज वेगवेगळ्या प्रकारच्या सोलेभाज्या शिजवल्या जात असून, स्वयंपाकघरात देशी चवींचा उत्सव सुरू आहे.
दर घसरले, चव मात्र वाढली
सध्या बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे.
दुधमोगरा : ४०० वरून २०० रु./किलो
लष्करी (चितरंगी) : ४०० वरून २०० रु./किलो
वाल : १५० वरून १०० रु./किलो
तुरीच्या शेंगा : १३० वरून ८० रु./किलो
या दरघटीमुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून खवय्यांपर्यंत साऱ्यांचीच चंगळ झाली आहे. त्यामुळे वऱ्हाडात सोलेभाजी महोत्सव सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
फेब्रुवारीपर्यंत सोले-वांग्याची मेजवानी
ही खास वऱ्हाडी सोले-वांगे भाजी आणि सोलेभात फेब्रुवारीअखेरपर्यंत स्वयंपाकघरात पाहायला मिळणार आहे. लग्नसोहळे, स्नेहभोजन आणि विविध कार्यक्रमांतही या भाज्यांना विशेष मागणी आहे.
तुरीच्या दाण्यांचे खास पदार्थ
तुरीच्या शेंगा सुकेपर्यंत त्यापासून कढीगोळे, तव्यावर भाजलेले तुरीचे दाणे, पातळ सोलेभाजी, सोले-वांगे, सोले-कोबी, बटाट्यांसह मिसळभाजी, आमटी, सोलेभात, मोकळे सोले, सोले कचोरी असे विविध प्रकार तयार केले जातात. उरलेले दाणे वड्या करून वाळवले जातात, तर काही शेंगा मीठ टाकून उकळूनही खाल्ल्या जातात.
या हिवाळी भाज्यांच्या विक्रीमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. डिसेंबर ते जानेवारी हा तुरीच्या शेंगांचा मुख्य काळ असल्याने या दोन महिन्यांत खवय्यांना खास देशी पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. थंडीच्या दिवसांत वऱ्हाडाची ओळख ठरलेली सोले-वांग्याची चव पुन्हा एकदा सर्वांच्या जिभेवर रेंगाळताना दिसत आहे.
