Solar Scheme : केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदाच्या वर्षी घरकुल मिळणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल अनुदानासोबतच सौरऊर्जेचा (Solar) लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Solar Scheme)
'प्रधानमंत्री सूर्यघर योजना'अंतर्गत घराच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार असून, या योजनेची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) मार्फत केली जाणार आहे.(Solar Scheme)
अमरावती जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात उद्दिष्ट ठेवण्यात आलेल्या सुमारे ८० हजार घरकुल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. मात्र ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(Solar Scheme)
घरकुलासोबतच सौरऊर्जेचा लाभ
जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक केव्हीपर्यंत सौरऊर्जा प्रकल्पासाठी अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे घरगुती वीजबिलात बचत होणार असून स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
लाभार्थ्यांचा हिस्सा अत्यल्प
मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या एकूण अनुदानात राज्य शासनाच्या हिश्श्यातून ५० हजार रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे, सौरऊर्जा प्रकल्पासाठी लाभार्थ्यांना केवळ अडीच हजार रुपये स्वतः भरावे लागणार असल्याने ही योजना सर्वसामान्यांसाठी परवडणारी ठरणार आहे.
गटानुसार अनुदानाची रचना
दारिद्र्यरेषेखालील (BPL) लाभार्थी : राज्य शासनाकडून १७ हजार ५०० रुपये, केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये अनुदान
सर्वसाधारण गट : राज्य शासन – १० हजार रुपये, केंद्र शासन - ३० हजार रुपये
अनुसूचित जाती (SC): लाभार्थी हिस्सा – ५ हजार रुपये, राज्य शासन – १५ हजार रुपये, केंद्र शासन – ३० हजार रुपये
अनुसूचित जमाती (ST): लाभार्थी हिस्सा – ५ हजार रुपये, राज्य शासन – १५ हजार रुपये, केंद्र शासन – ३० हजार रुपये
जिल्ह्यातील लाभार्थी संख्या
अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत सुमारे ८० हजार लाभार्थ्यांना सौरऊर्जेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.
यामध्ये यशवंत पंचायतराज, रमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आहे.
अपूर्ण घरकुलांवरही लक्ष
सौरऊर्जा योजनेचा जास्तीत जास्त लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न सुरू असून जिल्ह्यातील ४१७ अपूर्ण घरकुलांच्या बांधकामाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सौरऊर्जा योजनेचा लाभ घरकुल लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करून त्यांनाही या योजनेत समाविष्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.- प्रीती देशमुख, प्रकल्प संचालक
या योजनेमुळे घरकुल लाभार्थ्यांना केवळ सुरक्षित निवारा नव्हे, तर दीर्घकालीन वीजबचतीसह स्वच्छ ऊर्जेचा लाभ मिळणार असून ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
