Solar Power : शेतीतील वाढता खर्च, निसर्गाची अनिश्चितता आणि उत्पन्नाची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी आता पर्यायी मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. (Solar Power)
मूर्तिजापूर तालुक्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असून, यामागे शेतकऱ्यांना मिळणारी हमखास आणि निश्चित उत्पन्नाची शाश्वती हे प्रमुख कारण ठरत आहे.(Solar Power)
सध्या शेतकऱ्यांना एका एकरासाठी वर्षाकाठी सुमारे ५० हजार रुपये भाडे मिळत असल्याने अनेक शेतकरी प्रत्यक्ष शेती करण्याऐवजी सौरऊर्जा कंपन्यांशी दीर्घकालीन करार करत आहेत. मात्र, या प्रवृत्तीमुळे भविष्यात पेरणी क्षेत्र घटण्याची आणि अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Solar Power)
गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय अधिकच जोखमीचा ठरत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच मजुरांची टंचाई, बियाणे, खते, औषधे यांचे वाढलेले दर आणि उत्पादन खर्चात झालेली मोठी वाढ यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे.
वर्षभर कष्ट करूनही अपेक्षित उत्पादन किंवा बाजारभाव मिळेलच, याची खात्री राहत नसल्याने अनेक शेतकरी पर्यायी उत्पन्नाच्या शोधात आहेत.
थेट कंपन्यांशी करार
मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांतील सौरऊर्जा कंपन्यांचे प्रतिनिधी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून १० ते १५ वर्षांसाठी शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याचे करार करत आहेत.
विशेष म्हणजे, या व्यवहारांसाठी कृषी विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याने विभाग या घडामोडींविषयी जवळपास अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा प्रकार अधिक वेगाने वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सुपीक जमिनीवर सौर प्रकल्प
चिंताजनक बाब म्हणजे सौरऊर्जा प्रकल्पांसाठी दिली जाणारी बहुतांश जमीन ही सुपीक आणि चांगली उत्पादनक्षमता असलेली आहे. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे होणारे नुकसान आणि शेतीतील श्रमटंचाई लक्षात घेता शेतकरी कंपन्यांकडून मिळणाऱ्या ठरावीक व हमखास उत्पन्नाला प्राधान्य देत आहेत. मात्र, एकदा सौर प्रकल्प उभारला गेल्यानंतर त्या जमिनीवर पुढील अनेक वर्षे अन्नधान्याचे उत्पादन पूर्णपणे थांबते.
भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न
लोकसंख्या वाढीमुळे भविष्यात अन्नधान्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा वेळी सुपीक शेतजमीन सौरऊर्जा प्रकल्पांसाठी वापरली गेल्यास अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
भविष्यातील अन्न गरज लक्षात घेता शेतकऱ्यांनी आणि शासनाने या बाबीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सौरऊर्जेसाठी केवळ खडकाळ, कमी उत्पादन देणारी किंवा पडिक जमीन वापरण्याबाबत धोरण ठरवावे. - राजू वानखडे, अध्यक्ष, प्रगती शेतकरी मंडळ, मूर्तिजापूर
सौरऊर्जा निर्मिती ही काळाची गरज असली तरी त्यासाठी सुपीक शेती जमीन वापरणे कितपत योग्य आहे, यावर आता व्यापक चर्चा आणि ठोस धोरणाची आवश्यकता असल्याचे मत कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे.
