नंदुरबार : जमिनीचे आरोग्य आबाधित राहावे, याकरिता मृदा तपासणी करणे आवश्यक असून, त्याकरिता आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका तपासणे काळाची गरज आहे. शिवाय स्थानिक बोलीभाषेत माती पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत सहायक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी व्यक्त केले.
शहादा कृषी विभागामार्फत वडगाव येथे जागतिक मृदा दिनानिमित्त शेताच्या बांधावर जमीन आरोग्य पत्रिका प्रात्यक्षिक आयोजित केले होते. रासायनिक खते, पाण्याचा अनावश्यक वापर, पीक पद्धती, सेंद्रिय खताचा अभाव या कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले असून, त्यांचा थेट उत्पादनावर विपरीत परिणाम दिसू लागले आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य आबाधित राहावे याकरिता मृदा तपासणी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले...
अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण, हवामानातील बदल, दारिद्र्य निर्मूलन, शाश्वत विकास आणि मानवी कल्याणासाठी मातीचे गुणधर्म समजून माती हा एक आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. अन्नधान्याचा ९०% गरजा हे मातीमुळेच पूर्ण होतात. जंगल वाढविण्यासाठी मातीची गरज असते, मातीमध्ये पाणी आडवण्याची, पाणी साठविण्याची, पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे.
माती तयार होण्यासाठी..
माती तयार होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो; एक इंच (सुमारे २.५ सेमी) माती तयार होण्यासाठी ५०० ते हजारो वर्षांचा वेळ लागू शकतो, कारण ही एक मंद नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यात खडक फुटणे (विदारण), हवामान, जैविक घटक (वनस्पती, सूक्ष्मजंतू) आणि वेळ हे घटक काम करतात, आणि जास्त तापमान व पाऊस असलेल्या ठिकाणी ही प्रक्रिया थोडी जलद होते, तर कमी हवामानाच्या प्रदेशात ती खूपच हळू होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मानवाने विज्ञान तंत्रज्ञानातून कितीही प्रगती केली असली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्मिती करता येत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो, म्हणून जमिनीचे क्षार कमी करण्यासाठी प्रयत्न करावा.
रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर करावा. गांडूळ व कीटक यासारखे नैसगिक जीवसुष्टीचा उपयोग करून जमिनीमध्ये पौष्टिक घटक वाढवावे म्हणून जमीन सुपिकता निदर्शकानुसार जमिनीची आरोग्य तपासणी करणे. साधी माती नमुना, विशेष माती नमुना, पाणी नमुना करून घेणे त्यानुसारच औषधाची फवारणी करणे, रासायनिक खताची मात्रा देणे, पिकाची निवड करणे याबाबत सल्ला दिला.
