Shetmal Vahatuk : अन्नधान्य, साखर, सिमेंट, कोळसा आणि लोखंडासारख्या पारंपरिक मालवाहतुकीपलीकडे जात आता कृषी उत्पादनांकडे लक्ष केंद्रीत केलेल्या मध्य रेल्वेला 'बटाट्यां'मुळे मोठा आर्थिक फायदा झाला आहे. (Shetmal Vahatuk)
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, बटाट्यांच्या एकाच खेपमधून रेल्वेला तब्बल २८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे, हे यश तब्बल तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर मिळाले आहे.(Shetmal Vahatuk)
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला दरवर्षी अन्नधान्य, साखर, सिमेंट, लोहा, कोळसा आदींच्या मालवाहतुकीतून शेकडो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. (Shetmal Vahatuk)
मात्र, उत्पन्नाचे स्रोत अधिक मजबूत करण्यासाठी आणि कृषी मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील विविध कृषी उत्पादनांचा सखोल अभ्यास सुरू केला होता.
या अभ्यासात मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील हिरदागड रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर बटाट्याचे उत्पादन होत असल्याची माहिती समोर आली.
पूर्वेकडील राज्यांत बटाट्यांना मोठी मागणी
हिरदागड परिसरातील बटाट्यांना पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यांमध्ये मोठी मागणी असल्याचेही निदर्शनास आले. मात्र, रेल्वेऐवजी ट्रक आणि अन्य वाहनांद्वारे बटाटे या राज्यांकडे पाठवले जात होते.
ही संधी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने बटाटा उत्पादकांना रेल्वेमार्गे मालवाहतूक करण्यासाठी आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना अखेर यंदा यश आले आहे.
४२ बीसीएन रेक, १,२९८ किमीचा प्रवास
त्यानुसार, २८ डिसेंबर रोजी हिरदागड जंक्शनवरून ४२ बीसीएन वॅगनची एक पूर्ण रेक बटाट्यांसह सांकराईल (हावडा) गुड्स शेडकडे रवाना करण्यात आली.
सुमारे १,२९८ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ही बटाट्यांची खेप यशस्वीपणे गंतव्यस्थानी पोहोचली. या एकाच खेपमधून मध्य रेल्वेला २८ लाख रुपयांचे भाडे उत्पन्न मिळाले आहे.
यापूर्वीही झाला होता प्रयत्न
याआधी ३१ डिसेंबर २०२२ रोजी हिरदागड स्थानकावरून अशाच प्रकारे बटाट्यांची एक मालवाहू गाडी सांकराईल (हावडा, कोलकाता) गुड्स शेडसाठी रवाना करण्यात आली होती. त्या वेळी रेल्वेला १५ लाख १७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, त्यानंतर विविध कारणांमुळे बटाटा उत्पादकांनी रेल्वेकडे पाठ फिरवली होती आणि बटाट्यांची वाहतूक पुन्हा रस्तेमार्गाने सुरू झाली होती.
अखेर बटाटा उत्पादक रेल्वेकडे वळले
यंदा रेल्वे प्रशासनाने अधिक प्रभावी नियोजन, वेळेत रेक उपलब्ध करून देणे, माल चढवणे-उतारणे सुलभ करणे आणि उत्पादकांशी थेट संवाद साधणे अशा उपाययोजना केल्या. त्यामुळे बटाटा उत्पादक पुन्हा रेल्वेमार्गे मालवाहतुकीस राजी झाले. याचा थेट फायदा रेल्वेला महसूलवाढीच्या रूपाने मिळाला आहे.
८ ते १० रेकचे उद्दिष्ट
यंदा सध्या केवळ एकच रेक बटाट्यांची रवाना झाली असली, तरी पुढील कालावधीत ८ ते १० रेक बटाटा मालवाहतूक करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने निश्चित केले आहे. यामुळे रेल्वेच्या मालवाहतूक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यासोबतच कृषी मालाच्या वाहतुकीत रेल्वेचा वाटा अधिक भक्कम करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
कृषी उत्पादक आणि रेल्वे यांच्यातील ही भागीदारी यशस्वी ठरल्यास भविष्यात इतर कृषी मालासाठीही अशाच प्रकारचे नियोजन केले जाईल, अशी माहिती स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
