मुंबई : बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज माफ करून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जनतेला अशा दिशाभूल करणाऱ्या मोहिमांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेच्या भूलथापांना बळी पडू नका, अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगा, असे आवाहन केंद्रीय बँकेने केले आहे.
अर्थव्यवस्थेला धोका
आरबीआयने स्पष्ट केले की, अशा मोहिमांमुळे केवळ जनतेची फसवणूक होत नाही, तर देशाच्या पतव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहे.
बँकांच्या आर्थिक स्थैर्याला धक्का पोहोचतो आणि प्रामाणिक ठेवीदारांच्या हिताला बाधा येते. याने आर्थिक नुकसान अटळ असल्याचे बँकेने म्हटले आहे.
नेमका प्रकार काय आहे?
काही व्यक्ती आणि संस्था सोशल मीडिया, जाहिराती आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे 'कर्जमाफी' करून देण्याचे दावे करत असल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले आहे.
हे लोक थकीत कर्ज माफ करून देण्याचे खोटे आश्वासन देतात आणि त्याबदल्यात 'कर्जमाफी प्रमाणपत्र' जारी करतात. यासाठी सर्वसामान्यांकडून सेवा शुल्क किंवा कायदेशीर खर्चाच्या नावाखाली मोठी रक्कम उकळली जात आहे.
आरबीआयचे आवाहन...
कर्जमाफीचे दावे करणाऱ्या कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. कोणत्याही माहितीसाठी थेट आपल्या बँकेशी किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधा.
