यवतमाळ : अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरीअपघात विमा योजनेतून दोन लाख, एक लाख रुपये अशी मदत देण्याची तरतूद आहे.
जिल्ह्यात २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये एकूण २८ अपघातांच्या घटना घडून काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर काही शेतकरी जखमी झाले. मात्र शासनाने नियुक्त केलेल्या विमा कंपनीने २८ प्रस्ताव त्रुटीत काढून 'हात' वर केले आहेत. यामुळे शेतकरी कुटुंबांना मदत मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीज, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धोका, रस्ते अपघात, वाहन अपघात यांसारख्या नैसर्गिक व मानवी आपत्तींमुळे होणारे अपघात, तसेच शेती व्यवसायादरम्यान इतर कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू किंवा काही शेतकरी अपंगत्वास कारणीभूत ठरतात. शेतकरी कुटुंबाला अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे वाईट आर्थिक परिस्थिती निर्माण होऊन त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
कुटुंबांना मदतीचा आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख आणि जखमी झाल्यास एक लाख रुपये मदत दिली जाईल, असा शासन निर्णय आहे.
तसेच या योजनेच्या लाभासाठी शासनाने काही निकष ठेवले आहेत. सन २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत कृषी विभागाकडे मदतीसाठी एकूण २८ प्रस्ताव दाखल झाले. या प्रस्तावांची छाननी करून, कृषी विभागाने संबंधित कंपनीला पाठविले.
प्रस्ताव त्रुटीत काढले त्यानंतर कंपनीकडून मृत शेतकऱ्यांचा वारसांना आणि जखमी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत वितरित करणे अपेक्षित होते; परंतु, सदर सर्व प्रस्ताव परिपूर्ण नसल्याचे पत्र कंपनीने कृषी विभागाला पाठवून एक प्रकारे मदतच नाकारली आहे. सर्व घटनांना चार ते पाच वर्षे लोटले 3 असतानाही मदत प्रस्तावांचा न्यायनिवाडा झालेला नाही. कृषी अधीक्षक कार्यालयाने विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांना याबाबत पत्र पाठवून कंपनीने प्रस्ताव त्रुटीत काढले असल्याची माहिती कळविली आहे.
कृषी विभाग म्हणते पुन्हा पाठवू प्रस्तावविमा कंपनीकडे २८ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. सदर प्रस्ताव परिपूर्णच आहे. कंपनीने नेमक्या कोणत्या त्रुटी काढल्या, याची तपासणी करावी लागेल. त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव पाठविले जाईल.- संतोष डाबरे, कृषी अधीक्षक, यवतमाळ