जळगाव : राज्यात झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभरीतीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रांचे' (Aple Sarkar kendra) जाळे विस्तारीत करण्यात येणार असतानाच विविध दाखल्यांसाठी असलेल्या दरातही शासनाने मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आता या केंद्रावरून सुविधा घेताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
नागरिकांना शासकीय सेवा (Government Services) अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र' यांचे जाळे विस्तारित करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली होती.
त्यानुसार महानगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रांमध्ये १० हजारांवर लोकसंख्येसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर ग्रा.पं. स्तरावर ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर ५ हजारांवर लोकसंखेच्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत. परंतु, त्याच बरोबरीने सेवा महागली आहे.
शुल्कात वाढ केल्याने सेवा महागल्या, नवीन दर असे...
राज्य शासनाने केंद्रातील सेवांवरच्या शुल्कात वाढ केली आहे. त्यात मुद्रांक (१० रुपये), राज्य जीएसटी (४.५० रु.), केंद्रीय (४.५० रु.), राज्य सेतू केंद्र (२.५० रुपये, जिल्हा सेतू (५ रु.), महाआयटी (१० रु.), आपले सरकार सेवा केंद्र चालक (३२.५० रु.) अशी शुल्क आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच सेवा महागल्या आहेत.
असे आहेत दर
नागरिकांना लागणाऱ्या शासकीय दाखलांचे दर पाहिले असता जातीचा दाखला जुना दर ५८ रुपये तर नवीन दर १२८ रुपये, नॉन क्रिमीलीयरसाठी जुना दर ५८ रुपये तर नवीन दर १२८ रुपये, अधिवास प्रमाणपत्रासाठी जुना दर ३४ रुपये तर नवीन दर ६९ रुपये, उत्पन्नाचा दाखला जुनादर ३४ रुपये तर नवीन दर ६९ रुपये, प्रतिज्ञापत्र जुनादर ३४ रुपये तर नवीन दर ६९ रुपये, महिला आरक्षण प्रमाणपत्र जुनादर ३४ रुपये तर नवीन दर ६९ रुपये, शेतकरी प्रमाणपत्र जुनादर ३४ रुपये तर नवा दर ६९ रुपये, भूमीहीन प्रमाणपत्र ३४ रुपये तर नवा दर ६९ रुपये, श्रावणबाळ योजनेसाठी जुना दर ३४ रुपये तर नवीन दर ६९ रुपये अशी दरात वाढ झाली आहे.