Agriculture News : कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, हिंगोली व कृषी विभाग, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत आयोजित सात दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न झाले.
यावेळी डॉ. पी. पी. शेळके यांनी मधुमक्षिका पालनाचे व्यावसायिक महत्त्व अधोरेखित केले. शेती उत्पादन वाढी बरोबरच पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालना तील संधींचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे व वाचन साहित्य प्रदान करण्यात आले. प्रा. अजयकुमार सुगावे (पीक संरक्षण कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर) यांनी प्रशिक्षणार्थींना पुढील काळात आपल्या शेती व्यवसायात मधुमक्षिका पालनाचा अंगीकार करावा तसेच गावोगावी जनजागृती करावी,असे सांगितले.
प्रशिक्षणार्थीं यांनी सात दिवसातील विविध तज्ज्ञांकडून झालेल्या मार्गदर्शना बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच अभ्यास दौऱ्यामध्ये शुद्ध मधाची काढणी तसेच पॅकेजिंग लेबलिंग व विक्री व्यवस्थापन याबद्दल अभ्यास दौऱ्या दरम्यानचे समाधान व्यक्त केले.आगामी काळात गावोगावी मधमाशी संगोपन, संवर्धन व त्याचे महत्त्व इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला.तसेच कृषी विज्ञान केंद्र परिसरातील युनिट्स व कार्यपद्धतीची प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, कळमनुरी तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव, पाटील बी फार्मचे दिनकर पाटील, अजयकुमार सुगावे (विशेषज्ञ – पीक संरक्षण कीटकशास्त्र), अनिल ओळंबे (विशेषज्ञ – उद्यानविद्या), रोहिणी शिंदे (विशेषज्ञ – गृह विज्ञान विभाग) तसेच प्रशिक्षणासाठी निवडलेले जिल्ह्यातील शेतकरी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.