- प्रदीप बोडणे
गडचिरोली : यंदाच्या हंगामात टसर रेशीम शेतीत मोठे संकट ओढवले आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले आणि विक्रीही झाली. मात्र, ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस, वातावरणातील अनियमित बदल आणि प्रचंड आर्द्रतेमुळे टसर रेशीम अळ्यावर भीषण रोगाचा प्रादुर्भाव झाला.
संगोपनासाठी आंजन झाडांवर ठेवलेल्या अळ्या रोगाने कमकुवत होऊन कोश तयार करण्यापूर्वीच गळून पडल्या, त्यामुळे अख्खे उत्पादन वाया गेले. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानभरपाईची मागणी वेग घेऊ लागली आहे. अवकाळी पावसानंतर अळ्यांमध्ये पेब्राण, व्हायरस, बॅक्टेरिया यांसारख्या रोगांचा फैलाव झाला.
आरमोरी तालुक्यातील बोरीचक तसेच कुरखेडा तालुक्यातील कढोली परिसरात टसर रेशीम शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानभरपाईची मागणी वेग घेऊ लागली आहे. अवकाळी पावसानंतर अळ्यांमध्ये पेब्राण, व्हायरस, बॅक्टेरिया यांसारख्या रोगांचा फैलाव झाला.
अळीची पाने खाण्याची क्षमता कमी झाली, वाढ खुंटल्याने अळ्या झाडावर टिकू शकल्या नाहीत आणि मोठ्या प्रमाणात गळून पडल्या. यामुळे प्रतिबंधक उपाययोजना करूनही यंदाची टसर शेती तोट्यात गेल्याचे शेतकरी सांगतात. मागील वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना वाहतुकीच्या खर्चाचा भूर्दंड सोसावा लागला होता.
ऑगस्ट महिन्यातील उत्पादन शेतकऱ्यांनी आरमोरी येथील टसर रेशीम कार्यालयात विकले. तीन महिने उलटूनही विक्रीचे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
टसर रेशीम शेती हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. पण, यंदा मोठा तोटा झाला. आम्हाला नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. ऑक्टोबरमध्ये मिळालेले पहिले पीक आम्ही आरमोरी कार्यालयात विकले. पण, अजूनही पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे.
- नानाजी सोनबावणे, शेतकरी, कढोली.
