सलीम सय्यद
हडोळती (अहमदपूर) येथील ७५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार यांच्या डोळ्यांतून शुक्रवारी आनंदाश्रू वाहत होते. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेती करणाऱ्या या शेतकऱ्याला क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ७५ हजारांची बैलजोडी भेट दिली.
गावातून मिरवणूक काढत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या बैलजोडीने त्यांच्या आयुष्यात नव्या आशेची किरणं पेरली आहेत. हडोळती येथील अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार यांच्या डोळ्यांतून आज आनंदाश्रू वाहत होते. कारण त्यांच्या खांद्यावरील कोळपणीचा जू प्रत्यक्ष उतरवला गेला होता.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने त्यांना ७५ हजार रुपये किमतीची बैलजोडी भेट दिली. त्यामुळे वर्षानुवर्षे हालअपेष्टा सहन करूनही शेती सोडून न देणाऱ्या या ७५ वर्षीय शेतकऱ्याला आज नव्या आशेची किरणं दिसली आहेत.
स्वतःच्या खांद्यावर कोळपणी
अंबादास पवार यांची केवळ २ एकर ९ गुंठे शेती, तीही ठिकठिकाणी पसरलेली. त्यामुळे मशागत, पेरणी आणि कोळपणीच्या वेळी कायम समस्या उभी राहत होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बैलजोडी विकत घेणे शक्य नव्हते. मात्र शेती सुटू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या खांद्यावर कोळपणीचा जू घेऊन जमिनीत राबत राहिले.
बैलजोडीची गावभर मिरवणूक
अंबादास पवार यांची ही व्यथा समजल्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आणि गावातून निधी उभारून तब्बल ७५ हजार रुपये किंमतीची बैलजोडी खरेदी केली. शुक्रवारी या बैलजोडीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैलजोडी पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
हा आनंद शब्दांत व्यक्त होणार नाही
बैलजोडी मिळाल्यावर अंबादास पवार यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बैलजोडी दिल्यामुळे मला खूप आनंद गगनात मावेनासा झाला आहे, तो शब्दांत सांगता येत नाही. आता माझ्या खांद्यावरील जू उतरला आहे. ही बैलजोडी आमच्या कुटुंबाचा सदस्यच झाली आहे, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले.
बैलजोडीच्या वेगाची चाचणी
बैलजोडी दिल्यानंतर पवार यांनी हातात कासरा घेतला आणि कोळपणीची एक पात लावून बैलजोडीच्या कामाचा वेग तपासला. शेतात नांगर फिरताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पसरले. गावकऱ्यांनीही टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
हे ही वाचा सविस्तर : नंबर पाठवा… मदत देतो! अंबादास पवारांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद