नंदुरबार : एकीकडे रब्बी पिकांसाठी थंडी लाभदायी ठरत असतांना दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे केळीची वाढ खुंटली असून पानांवर करपासारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आधीच केळीचा भाव कमी आणि त्यातच निसर्गाच्या अशा संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटावर मात करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधांची फवारणी करीत आहे.
शहादा तालुक्यात यंदा केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. परंतु सुरुवातीपासूनच केळी उत्पादक शेतकरी विविध संकटाला सामोरे जात आहेत. वाढत्या थंडीचाही फटका केळीला बसत आहे. आधीच यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे केळीचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा नवीन संकट आले आहे.
जयनगर परिसरात या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. थंडीचे प्रमाणही चांगले असल्याने या पिकांना फायदेशीर ठरत आहे. मात्र या वाढत्या थंडीचा केळी पिकाच्या वाढीवर परिणाम जाणवत आहे. त्यातच कडाक्याच्या थंडीत केळी पिकांना पाणी दिले नाही तर झाड कोमेजायला सुरुवात होते आणि पाणी दिले तर केळीच्या मुळांवरती विपरीत परिणाम होतो.
थंडीचे प्रमाण असेच राहिले तर उत्पादनही घटणार
जास्त थंडीमुळे परिसरातील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत असून खर्च वाढण्याची - भीती व्यक्त करत आहेत. जर थंडीचे प्रमाण असेच कायम राहिले तर केळी उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
घड व झाडांची वाढ खुंटली
गेल्या दोन आठवड्यांपासून कडाक्याच्या थंडीमुळे तापमानात लक्षणीय घट झाल्याने केळी पिकावर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे केळीच्या झाडांची वाढ खुंटली असून पाने करपत आहेत. रात्रीच्या वेळी वाढलेली थंडी आणि सकाळची दवबिंदू यामुळे केळीच्या घडांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून किमान तापमान १० ते १३ अंशावर राहत आहे. एवढ्या कमी तापमानात केळीची वाढ देखील खुंटत असते. काही शेतांमध्ये थंडीमुळे केळीच 3 फळधारणा कमी झाली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जास्त थंडीमुळे निसावा प्रक्रिया मंदावते.
