गडचिरोली : पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाज बांधव परंपरागतरीत्या टसर रेशीम शेती करतात. परंतु यावर्षी सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे ही शेती लांबणीवर गेली असून रेशीम अळी मरत असल्याने उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडले आहेत.
रेशीम शेतीचे पहिले पीक जून-जुलै महिन्यात येते. मात्र, धानपट्ट्यातील टसर उत्पादक शेतकरी हे उत्पादन टाळून सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील दुसरे पीक घेतात. परंतु या वर्षी सततच्या पावसामुळे अंडीपुंज झाडावर ठेवण्याचा कालावधी वाढून ऑक्टोबरपर्यंत गेला आहे. त्यामुळे टसर कीटक संगोपनास जास्त काळ लागणार असून थंडीच्या दिवसात कोश निर्मितीवर परिणाम होतो.
या गावांमध्ये घेतले जाते उत्पादन
आरमोरी तालुक्यातील थोटेबोडी, मेंढेबोडी, नागरवाई, वडधा, देशपूर, मानापुर, सुकाळा तसेच कुरखेडा तालुक्यातील कढोली, जांभडी, गांगुली या गावांमध्ये टसर शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या शेतीसाठी लागणारा अंडीपुंज आरमोरी येथील रेशीम कार्यालयातून सवलतीच्या दरात मिळतो.
शेतकरी हे अंडीपुंज येन किंवा अंजनाच्या झाडावर ठेवतात. काही दिवसांनी अळ्या बाहेर पडून कोश तयार करतात. मात्र यंदा हवामानातील अनियमिततेमुळे अळ्या नष्ट होत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टसर रेशीम शेतकऱ्यांना शासनाकडून अर्थसहाय्य वाढवावे. आरमोरीच्या रेशीम कार्यालयाने उत्पादकांना अधिक सवलती द्याव्यात.
- रोशन भोयर, शेतकरी, कढोली
या वर्षात अति पावसामुळे टसर रेशीम शेती लांबणीवर गेली. झाडावर ठेवलेल्या अळ्या मरून पडत आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.
- जितेंद्र कांबळे, शेतकरी, कढोली
