गडचिरोली : महानगरपालिका क्षेत्रात जुनी सदनिका घेताना त्यावर कराची थकबाकी असल्यास दस्त नोंदणी करताना त्याची माहिती आता मिळणार आहे. त्यामुळे खरेदीदाराची संभाव्य फसवणूक टळणार आहे. थकबाकी दस्त नोंदणी करतानाच महापालिकांनाही विनासायास कराची थकबाकीची रक्कम मिळणार आहे.
सध्या नव्या सदनिकांचे दर जास्त असल्याने काही ग्राहक जुन्या सदनिका खरेदी करतात. मात्र, या सदनिकांवर नगरपालिकेच्या मालमत्ता, तसेच अन्य करांची थकबाकी असते. काही घरमालक ही माहिती जाणीवपूर्वक लपवतात.
त्यामुळे खरेदीदार मालमत्ता कर पावती नावावर करण्यासाठी महापालिकेत गेल्यानंतर त्याला थकबाकी असल्याची माहिती मिळते व ती भरल्यानंतरच मालकी हक्कात बदल केला जाईल, असे सांगितले जाते. मालमत्ता विक्री करणाऱ्याने ही बाब लपवल्याने संबंधित खरेदीदारालाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
रिसेलचे घर घेताना ही घ्या खबरदारी
कर भरल्याची पावती तपासावी, महापालिकेचे थकबाकी प्रमाणपत्र पाहावे, दस्त नोंदणीपूर्वी सर्व करांबाबत खात्री करून घ्यावी. राज्य सरकारच्या 'आय-सरिता' पोर्टलवर दस्त नोंदणी करतानाच महापालिकेच्या कर थकबाकीची माहिती उपलब्ध - होणार आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्व २८ महापालिकांमध्ये ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
घर घेतानाच कराची थकबाकी कळणार
दस्त नोंदणी करताना संबंधित मालमत्तेवर महापालिका कराची थकबाकी आहे की नाही, किती रक्कम बाकी आहे, याची माहिती तत्काळ समोर येणार आहे. त्यामुळे व्यवहार पारदर्शक होणार आहे.
थकबाकीसकट माथी मारतात जुनी घरे
आजपर्यंत अनेक विक्रेते जुनी घरे विकताना पाणीपट्टी, मालमत्ता कर किंवा इतर शुल्कांची थकबाकी लपवत होते. दस्त नोंदणीनंतर ही रक्कम नव्या मालकाला भरावी लागत होती. घर, भूखंड, खरेदी-विक्री व्यवहारात अनेकांची फसगत होते. अशी फसगत होऊ नये आणि गैरप्रकारांना आळा बसवा यासाठी आता नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीच्या 'आय सरिता' या पोर्टलवर ही सुविधा महानगर पालिकांमध्ये सुरू केली आहे.
Ujjawala Scheme : उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर किती रुपयांना मिळतो, सबसिडी किती मिळते?
