Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या गावात शेतकरी मासिक येतं का? नाव नोंदणी करा आणि घरपोच मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 17:41 IST

कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांचे महत्त्वपूर्ण लेख या शेतकरी मासिकात वाचायला मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत "शेतकरी मासिक" सुरु आहे. यात प्रामुख्याने हंगाम निहाय पिकांची सविस्तर माहिती, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, कृषि विभागाच्या विविध योजना, बाजारभिमुख कृषी उत्पादने, विक्री व पणन व्यवस्थापन तसेच कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित लेख दिले जातात. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असून शेतकरी मासिक घरपोच दिले जाते. 

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 1965 पासून शेतकऱ्यांसाठी प्रकाशित होणारे शेतकरी मासिक कृषी माहिती तंत्रज्ञानाचे विश्वासार्ह माध्यम म्हणून ओळखले जाते. मागील 54 वर्षापासून अव्याहतपणे कार्यरत आहे. यात कृषी क्षेत्राशी निगडीत विभाग जसे की पशु संवर्धन, खादी ग्रामोद्योग, दुग्धव्यवसाय, रेशीम शेती, मत्स्य शेती इत्यादी विभागांचे महत्त्वपूर्ण लेख तज्ञ व्यक्ती व शास्त्रज्ञांमार्फत मासिकात समाविष्ट केले जातात. शेतकऱ्यांना अल्प दरात अंक पुरवण्याच्या शासनाच्या धोरणानुसार सध्या मासिक चालविले जात आहे. सद्यस्थितीत या शेतकरी मासिकाची सध्याची वर्गणीदार संख्या सुमारे 1.00 लाख आहे. 

दरम्यान गावपातळीपर्यंत पोहचणाऱ्या या मासिकाच्या माध्यमातून कृषि विद्यापिठातील नविन संशोधन तंत्रज्ञान, केंद्र शासनाच्या विविध कृषि संशोधन संस्था व कृषि विज्ञान केंद्र व शासनाच्या विविध योजना, कृषी क्षेत्रातील लक्षवेधक घडामोडी तसेच कृषि संलग्न व्यवसायाबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. येत्या एक ते दोन वर्षात शेतकरी मासिक वर्गणीदारांची संख्या 3.00 लाखापर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी मासिकाची वार्षिक वर्गणी 400 रुपये व्दिवार्षिक वर्गणी 800 रुपये असून एका मासिक अंकाची किंमत 35 रुपये आहे. शेतकरी मासिकाचे सभासद / वर्गणीदार कोणत्याही महिन्यामध्ये होता येते. सभासद झाल्यानंतर शेतकरी मासिक दरमहा वर्गणीदारांना पत्त्यावर घरपोच पाठविले जाते.

अशी करा नाव नोंदणी    संपादक, शेतकरी मासिक यांच्या नावे मासिक वर्गणी मनीऑर्डर किंवा ग्रास प्रणाली म्हणजेच https//gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीव्दारा तसेच ट्रेझरी चलनाव्दारे भरता येते. अधिक माहितीकरीता शेतकऱ्यांनी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व या शेतकरी मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीमहाराष्ट्रशेतकरीराज्य सरकार