चंद्रपूर : ऊसतोडीला सुरवात झाली असून साखर कारखान्यांच्या (Sugar Factory) परिसरात उसाने भरलेले ट्रॅक्टर पाहायला मिळत आहेत. मात्र या काळात अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागते. कारण रात्री किंवा धुके असताना रिफ्लेक्टर नसलेली वाहने, विशेषतः मागचे दिवे बंद असलेली किंवा रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने चालकांना दिसत नाहीत. यामुळे अपघात होऊ शकतो.
टेल लॅम्प बंद असलेली किंवा रस्त्याच्या कडेला उभी रिफ्लेक्टर वा रेडियम पट्टधा नसलेली वाहने अपघातांना कारणीभूत ठरतात. रिफ्लेक्टरचे मुख्य कार्य म्हणजे ते प्रकाश परावर्तित करतात. म्हणजेच ते स्वतः कोणताही प्रकाश निर्माण करत नाहीत. दुसऱ्या वाहनाचे हेडलाइट्स त्यांच्यावर पडताच, ते चमकून दुरूनच दिसतात.
रिफ्लेक्टर बसवण्याचा नियम काय ?
प्रत्येक प्रकारच्या मालवाहू आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाना आकारमानानुसार, प्रकारानुसार योग्य ठिकाणी, विशिष्ट रंगांचे मागच्या बाजूला लाल, पिवळे आणि योग्य दर्जाचे रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टा बसवणे बंधनकारक आहे. आयएसआय मानक असलेले रिफ्लेक्टर, रेडियम पट्टी वापरणे बंधनकारक आहे. मात्र अनेक वाहनचालक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
रिफ्लेक्टरचा फायदा काय?
वाहन चालकांना रात्री रिफ्लेक्टरमुळे वाहन स्पष्ट दिसते. त्यामुळे अपघातांची शक्यता कमी होते. मागून येणाऱ्या वाहनांना सुरक्षित अंतर राखता येते. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या वाहनांनी सर्वप्रथम रिफ्लेक्टरशिवाय प्रवास करू नये.
दंड आणि शिक्षेची तरतूद
मोटार वाहन कायद्यानुमार रिफ्लेक्टर नसल्यास ५०० ते २,००० रुपये दंड व उल्लंघन केल्यास परवानाही रद्द केला जाऊ शकतो. वाहनधारकांनी नियमांचे पालन करून आपला आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन केले आहे.
अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर बंधनकारक आहे. त्यामुळे स्वतः सह इतरांचाही जीव वाचू शकतो. परिणामी आमच्या कार्यालयातर्फे जनजागृतीसुद्धा केली जाते. मागील वर्षभरात रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनावर कारवाईसुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे.
- किरण मोरे, प्रभारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर
