नाशिक : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी उत्तम वाळुंज यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच रेड कॉर्न अर्थात लाल मक्याची लागवड केली आहे.
दोन एकर क्षेत्रावर केलेल्या या लागवडीला चांगले यश आले असून स्थानिक पातळीवर या जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगाची चर्चा सुरू आहे. या पिकातून साधारण ६० क्विंटल उत्पादन मिळेल, असा अंदाज वाळुंज यांनी वर्तवला आहे.
वाळुंज यांनी या मक्याची जूनमध्ये लागवड केली आहे. सुमारे ११० ते १२० दिवसांच्या कालावधीत रेड कॉर्नचे पीक बहरून आले आहे. योग्य हवामान व व्यवस्थित पीक व्यवस्थापन केल्याने प्रति एकर २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन येईल असा अंदाज आहे.
साध्या मक्याला प्रतिक्विंटल २,२०० ते २,५०० रुपये दर मिळत असताना रेड कॉर्नसाठी मागणीमुळे ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि जळजळ कमी करते.
पारंपरिक पिकांबरोबरच वेगळा आणि आरोग्यदायी प्रयोग करण्याची गरज मला जाणवली. मी पहिल्यांदाच रेड कॉर्नची लागवड केली. उत्पादन आणि भाव या दोन्ही बाबतीत हे पीक आशादायक आहे. बाजारात आरोग्यदायी धान्यांची मागणी पाहता रेड कॉर्न शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो.. रेड कॉर्नपासून जनावरांना ऊर्जा मिळते, विशेषतः दूध उत्पादन वाढविण्यास मदत होते.- उत्तम वाळुंज, शेतकरी
नावीन्यपूर्ण ग्राहकांसाठी पर्यायरेड कॉर्नमुळे शेती क्षेत्रात नावीन्य आणि ग्राहकांसाठी आरोग्यदायी पर्याय अशी दुहेरी संधी निर्माण होत असून, शेतकरी नव्या पद्धतींना सामोरे जाण्यास तयार असल्याचा सकारात्मक संदेश या प्रयोगातून दिसून आला आहे. रेड कॉर्नचा वापर पॉपकॉर्न, पीठ, भाकरी, पेज अशा पारंपरिक स्वरूपात तर औषधनिर्मिती, आरोग्यपूरक पदार्थ म्हणून होऊ शकतो.
विदेशात या मक्याचा वापर पीठ, पॉपकॉर्न, टॉर्टिला, नाश्ता पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. रेड कॉर्नपासून जनावरांना ऊर्जा मिळते, विशेषतः दूध उत्पादन वाढविण्यास मदत होते. जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि जळजळ कमी करते.