धुळे : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेशनवरील धान्य वाटप प्रणालीत शासनाकडून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आता रेशन दुकानांमधून मिळणारी ज्वारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गहू आणि तांदळाच्या प्रमाणातदेखील फेरबदल करण्यात आला आहे. यामुळे 'प्राधान्य कुटुंब' आणि 'अंत्योदय' योजनेतील लाभार्थीना आता नवीन कोट्यानुसार धान्य मिळणार आहे.
रेशनकार्डमध्ये पिवळे (BPL), केशरी (APL), आणि पांढरे (APL) असे तीन प्रकार असून, जे उत्पन्नानुसार दिले जातात. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अंत्योदय अन्न योजना (AAY) (सर्वात गरीब) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) असे प्रकार आहेत, ज्यात PHH कार्डधारकांना प्रति सदस्य ५ किलो धान्य मिळते. महाराष्ट्रात हे तीन रंगीत कार्ड प्रचलित आहेत, जे कमी दरात अन्नधान्य मिळवण्यासाठी वापरले जातात.
रेशनवरील धान्य वाटप सुधारित परिमाण
शासनाच्या नवीन नियमानुसार, आता लाभार्थ्यांना मिळणाऱ्या एकूण ३५ किलो (अंत्योदय) आणि ५ किलो (प्राधान्य) धान्याच्या रचनेत बदल झाला आहे. हा बदल जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे.
अंत्योदयमध्ये २१ किलो गहू, १४ किलो तांदुळ
अतिशय गरीब कुटुंबांसाठी असलेल्या अंत्योदय अन्न योजनेत प्रति कार्ड ३५ किलो धान्य मिळते. नवीन फेरबदलानुसार आता या कुटुंबांना २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ मिळणार आहे.
'प्राधान्य' मध्ये तांदूळ २, गहू ३ किलो मिळणार
प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थीना आता प्रति सदस्य ५ किलो थान्य मिळते. त्यात आता ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ असा बदल करण्यात आला आहे. (पूर्वी हे प्रमाण ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू होते).
कशामुळे झाला बदल ?
भारतीय अन्न महामंडळाकडे असलेला गव्हाचा आणि तांदळाचा उपलब्ध साठा, तसेच राज्याच्या मागणीनुसार हा बदल करण्यात आला आहे. गव्हाचा वापर अधिक असलेल्या भागात गव्हाचे प्रमाण वाढवून समतोल साधण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
