Join us

Ranbhajya : नऊ आजारांवर एकच उपाय गुळवेल, गुळवेलचा काढा अन् भाजी कशी बनवायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:11 IST

Ranbhajya : गुळवेल आयुर्वेदात (Gulvel Ranbhaji) अत्यंत उपयुक्त मानली जाते. तीचे विविध औषधी उपयोग सांगितले जातात..

Ranbhajya : गुळवेल (Gulvel) ही वेलवर्गीय वनस्पती असून ती मोठ्या झाडांवर पसरते. हिची पाने हृदयाकृती व गडद हिरव्या रंगाची असतात. पानांचा देठ लांबसर असून, पानांची रुंदी ५–१० सेमी पर्यंत असते. नोव्हेंबर ते जून या कालावधीत फुलोरा व फळधारणा होते. पिवळसर फुलांनंतर कठीण कवच असलेली फळं तयार होतात, जी पिकल्यावर लालसर होतात.

गुळवेल आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त मानली जाते. खाली तिचे काही औषधी उपयोग दिले आहेत:

  • ज्वरनाशक – गुळवेलाचा काढा तापात उपयोगी.
  • शक्तिवर्धक – अशक्तपणा व थकवा दूर करतो.
  • भूक वाढवणारा – अपचन, अन्न न रुचणे यात उपयुक्त.
  • त्वचारोगनाशक – खाज, त्वचेचा दाह कमी होतो.
  • संधिवात व आम्लपित्त – गुळवेल सत्व दीर्घकालीन आम्लपित्तात प्रभावी.
  • रक्तशुद्धी – रक्तातील दोष दूर करून त्वचाविकार कमी करतो.
  • मधुमेह नियंत्रण – शरीरावर साखरेचा परिणाम कमी करतो.
  • सर्दी-खोकला – वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यावर गुणकारी.
  • कावीळ – यामध्ये गुळवेलाच्या भाजीचा वापर उपयोगी.

गुळवेल पानांची भाजी

साहित्य : 

  • गुळवेलीची पाने – १ कप (बारीक चिरून)
  • तेल – २ चमचे
  • जिरे – ½ चमचा
  • हिंग – १ चिमूट
  • कांदा – १ (बारीक चिरून)
  • लसूण – २-३ पाकळ्या
  • हिरवी मिरची – १-२
  • हळद – ¼ चमचा
  • मीठ – चवीनुसार

कृती : 

  • पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
  • कढईत तेल गरम करून जिरे, हिंग घाला.
  • कांदा, लसूण परतून त्यात मिरची व हळद घालावी.
  • त्यात चिरलेली गुळवेल पाने घालून झाकण ठेवून शिजवावे.
  • मीठ घालून परतून गरमागरम भाजी भाकरीसोबत वाढावी.

गुळवेल काढा

  • साहित्य  : 
  • गुळवेलचे देठ – १०–१५ तुकडे
  • पाणी – २–३ कप

कृती : 

  • पाण्यात गुळवेलाचे तुकडे टाकून मिश्रण उकळावे.
  • पाणी अर्ध्यावर येईपर्यंत उकळावे.
  • गाळून कोमट असताना सेवन करावे.
  • हा काढा ताप, अशक्तपणा, आम्लपित्त, सर्दीखोकला आणि इतर अनेक आजारांमध्ये लाभदायक आहे.

टीप : गुळवेल वापरताना ती नीट ओळखूनच वापरावी. फार मोठ्या प्रमाणात वापरल्यास परिणाम उलट्या होऊ शकतात. गर्भवती व स्तनदा महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापर करावा. ही रानभाजी केवळ आहार नव्हे, तर आयुर्वेदाचे संजीवन आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक संशोधन याचा संगम असलेली गुळवेल आरोग्य रक्षणात मोलाची ठरते.

- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी, आडगाव चोथवा, तालुका-येवला, जिल्हा-नाशिक 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरीभाज्या