Rajma Cultivation : बदलते हवामान, कमी होत जाणारा पावसाचा भरवसा आणि जमिनीचा खालावलेला पोत यावर उपाय म्हणून धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आता कडधान्य वर्गातील राजमा (पवटा) पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. (Rajma Cultivation)
यंदा जिल्ह्यात राजमा पिकाच्या पेरणीत विक्रमी वाढ झाली असून, गेल्या वर्षी १२ हजार हेक्टरवर असलेला पेरा थेट २६ हजार हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. (Rajma Cultivation)
कमी खर्च, कमी पाणी आणि चांगला बाजारभाव या तिन्ही बाबी एकत्र मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी राजमा हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.(Rajma Cultivation)
धाराशिव जिल्हा हा प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला जिल्हा आहे. यंदा परतीच्या पावसाने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पारंपरिक गहू व हरभऱ्याऐवजी राजमाची निवड केली. (Rajma Cultivation)
गव्हासारख्या पिकाला वारंवार पाणी द्यावे लागते, तर राजमा हे पीक उपलब्ध ओलाव्यावर आणि अत्यल्प सिंचनावरही चांगले उत्पादन देते. यामुळे उमरगा, लोहारा आणि कळंब या तालुक्यांमध्ये राजमाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.(Rajma Cultivation)
जमिनीच्या सुपीकतेसाठी उपयुक्त पीक
कृषी तज्ज्ञांच्या मते, राजमा हे नत्र स्थिरीकरण करणारे पीक असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत होते.
रब्बी हंगामात राजमाचे पीक घेतल्यास पुढील खरीप हंगामात जमिनीची सुपीकता वाढते. पीक पालट (क्रॉप रोटेशन) म्हणून राजमा घेतल्यास जमिनीचे आरोग्य टिकून राहते, तसेच रासायनिक खतांवरील खर्चही कमी होतो. त्यामुळे शेतकरी दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने या पिकाकडे वळत आहेत.
गावातच थेट खरेदी; शेतकऱ्यांचा फायदा
राजमाच्या पेरणीमध्ये वाढ होण्यामागे केवळ कमी खर्च हेच कारण नाही, तर बाजारपेठेत मिळणारा चांगला दर हेही महत्त्वाचे कारण आहे.
बहुतांश ठिकाणी व्यापारी थेट गावात येऊन राजमाची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक व हमालीचा खर्च वाचतो. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
याशिवाय, राजमाचा पाला जनावरांसाठी पौष्टिक चारा म्हणून वापरता येत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे. उन्हाळ्यात पशुधनासाठी चाऱ्याची अडचण काही प्रमाणात दूर होत असल्याचेही चित्र आहे.
हरभऱ्याला फटका; राजमाकडे कल
रब्बी हंगामातील पारंपरिक हरभरा पिकावर हवामानातील बदलांचा मोठा परिणाम होत आहे. तापमानातील चढ-उतारामुळे हरभऱ्यावर रोग व कीड प्रादुर्भाव वाढत असून, कीटकनाशकांवरील खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
याच्या तुलनेत राजमातून स्थिर उत्पादन आणि समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वाढत आहे.
राजमा हे जमिनीत नत्र स्थिरीकरण करणारे पीक आहे. रब्बी हंगामात राजमाचे उत्पादन घेतल्यास पुढील हंगामात जमिनीची सुपीकता वाढते. सध्या हरभरा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही. त्या तुलनेत राजमातून चांगले उत्पन्न आणि भाव मिळत आहे.- राजकुमार मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव
कमी पाणी, कमी खर्च, जमिनीचा पोत सुधारणा आणि चांगला बाजारभाव या सर्व बाबी लक्षात घेता धाराशिव जिल्ह्यात राजमा पीक शेतकऱ्यांसाठी नवे आशास्थान ठरत असून, आगामी काळात या पिकाचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
