दत्ता जोशी
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी पारंपरिक पिकांसोबतच 'राजमा' या परिसरासाठी नव्या पिकाची लागवड करून एक वेगळा प्रयोग सुरू केला आहे. (Rajma Cultivation)
यंदा प्रथमच सुमारे २० हेक्टर क्षेत्रावर राजमा पिकाची लागवड झाल्याने परिसरात या पिकाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. कमी कालावधीत येणारे, तुलनेने कमी खर्चिक आणि बाजारात चांगला दर मिळणारे पीक म्हणून राजमाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.(Rajma Cultivation)
सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या पारंपरिक पिकांमध्ये सातत्याने वाढणारा खर्च, बदलते हवामान आणि अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने अनेक शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात होते. अशा परिस्थितीत राजमा हे पीक शेतकऱ्यांसाठी आशादायी पर्याय ठरत असल्याचे चित्र आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित बियाण्यांचा वापर, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब तसेच सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आल्याने सध्या पीक जोमात असून उत्पादन समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. घाटनांद्रा येथील शेतकरी भारत शिंदे यांच्या शेतात राजमाचे पीक चांगले बहरले आहे.
नवीन पिकांचे प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास यामुळे घाटनांद्रा परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे या राजमा पिकाच्या प्रयोगातून स्पष्ट होत आहे.
परंपरागत पिकांमध्ये खर्च वाढतच चालला होता. राजमा हे पीक कमी कालावधीत येते आणि बाजारात त्याला चांगला दर मिळतो. त्यामुळे यंदा प्रयोग म्हणून दोन एकर क्षेत्रावर लागवड केली असून पीक चांगले वाढत आहे.- भारत शिंदे, शेतकरी
राजमा हे सिल्लोड तालुक्यासाठी नवीन पीक असले, तरी येथील हवामान आणि जमीन या पिकासाठी अनुकूल आहे. यंदा घाटनांद्रा गावात अनेक शेतकऱ्यांनी राजमाची लागवड केली असून बाजारात या पिकाला चांगली मागणी आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच चांगला लाभ होऊ शकतो.- भायडू मोरे, शेतकरी
कृषी विभागाकडूनही या प्रयोगाकडे सकारात्मक नजरेने पाहिले जात आहे. सिल्लोड तालुक्यातील शेतकरी आता वेगवेगळ्या नवीन पिकांकडे वळत असून त्यांची मानसिकता सकारात्मक झाली आहे. भविष्यात घाटनांद्रा परिसरात राजमा पिकाचे क्षेत्र निश्चितच वाढेल. - महेश चाथे, कृषी सहायक
हे ही वाचा सविस्तर : Rajma Cultivation : जमिनीचा पोत सुधारतोय; राजमाने दिला शेतकऱ्यांना नवा आधार
