नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwer) शेवटचं टोक असलेल्या ओझरखेडसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने भात शेतीच नुकसान केलं आहे. भात पिकाला कोंब फुटले असून उत्पादन घटणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनोत्तर पावसाने (Post Monsonn Rain) धुमाकूळ घातला आहे. नाशिकच्या अनेक तालुक्यांमध्ये पावसाने शेती पिकाचे नुकसान केले आहे. यात त्र्यंबक तालुक्यातील हरसूल पट्ट्यातील ओझरखेड भागातही भात पिकासह उडीद पिकाचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले भात पीक भुईसपाट झाले असून पूर्ण पाण्यात असल्याने शंभर टक्के नुकसान झाले आहे.
या भागातील प्रमुख पीक म्हणून भात पीक ओळखले जाते. इतर पिके कमी प्रमाणात घेतली जातात. या काळात भात पीक काढणीच्या अवस्थेत असते. शिवाय यंदा चांगले उत्पादन मिळणार अशी आशा या शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन काढणीच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे भात पिके पाण्यात सापडली आहेत.
अधिक खराब होऊ नये म्हणून कापून बांधांवर ठेवली जात आहेत. मात्र अद्यापही वातावरण जैसे थे असल्याने यातून हातात काहीच पडणार नसल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे सुरु झाले आहेत, मात्र सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
चार महिने मेहनत घेऊन भात पिके उभी केली होती. मात्र ऐन काढणीच्या वेळी पावसाने दगा दिला. त्यामुळे उत्पादन कमीच निघणार आहे. आता आहे ते हाती पाडून घ्यायचं वेळ आली आहे. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही, शासनाने त्वरित मदत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. 
 - काळू गवळी, उपसरपंच, ओझरखेड.
