Naglichi Bhakar : शहरात जरी कमी प्रमाणात असली तरी ग्रामीण भागात मात्र आजही नागलीची भाकर खाल्ली जाते. मात्र अलीकडे नागलीचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. जे नागली उत्पादन करणारे शेतकरी आहेत, ते देखील अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळू लागले आहेत. दुसरीकडे नागलीचे महत्व आता शहर वासियांना देखील समजू लागले आहे.
नागलीला नाचणी किंवा रागी असेही म्हटले जाते. या भाकरीत लोह, कॅल्शियम, फायबर, प्रथिने, आणि अँटीऑक्सिडंट्स प्रचंड प्रमाणात असतात. आदिवासी व ग्रामीण भागात याला आरोग्यदायी धान्य म्हटलं जातं. म्हणूनच आहारात नागलीची भाकरी असायला हवी. ही भाकरी कशी बनवायची, तिचे फायदे काय आहेत, ते पाहुयात...
नागलीची भाकरी खाण्याचे फायदे :
- नागलीत भरपूर कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत करते.
- लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्तशुद्धी व हिमोग्लोबिन वाढवते.
- शिवाय ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहेत, म्हणून डायबेटीस नियंत्रित करते.
- नागलीच्या भाकरीतून फायबर मिळत असल्याने पचनास मदत करते.
- विशेष म्हणजे वजन नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त
नागलीची भाकर कशी बनवायची?
साहित्य : केवळ नागलीचे पीठ, चवीनुसार मीठ अन् पाणी.
अशी बनवा भाकर :
- एका परातीत नागलीचं पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ टाका.
- हळूहळू गरम पाणी घालून पीठ मळा.
- पीठ मऊ व एकसंध होईपर्यंत मळा.
- गोळा करून हलक्या हातानेच थापून भाकरी तयार करा.
- गरम तव्यावर भाजा. दोन्ही बाजूंनी शेकून, थोडंसं पाणी लावून वाफ येऊ द्या.