Rabi Crop Fertilizer Crisis : रब्बी हंगामातील पिके सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच युरियासह रासायनिक खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. (Rabi Crop Fertilizer Crisis)
त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह इतर रब्बी पिकांचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. खतांचा अपुरा पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.(Rabi Crop Fertilizer Crisis)
रब्बी हंगामात पिकांच्या वाढीसाठी युरियाची सर्वाधिक गरज असते. विशेषतः गहू व हरभरा पिकांना खताचा डोस वेळेवर न मिळाल्यास पिकांची वाढ खुंटते. (Rabi Crop Fertilizer Crisis)
मात्र, सध्या कृषी सेवा केंद्रांमध्ये युरियासह डीएपी, एनपीकेसारखी रासायनिक खते अपेक्षित प्रमाणात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.(Rabi Crop Fertilizer Crisis)
५५ कृषी सेवा केंद्रांतील स्थिती चिंताजनक
खामगाव तालुक्यात एकूण ५५ कृषी सेवा केंद्रांमार्फत युरिया खत विक्री केली जाते. अनेक केंद्रांवर ऑनलाईन प्रणालीमध्ये खत उपलब्ध असल्याचे दर्शविले जाते; मात्र प्रत्यक्षात शेतकरी दुकानात गेल्यानंतर 'खत संपले' असे सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, खर्च आणि मेहनत वाया जात आहे.
उत्पादन खर्च वाढण्याची भीती
वेळीच खत न मिळाल्यास पिकांची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. आधीच बियाणे, मजुरी, सिंचन, कीटकनाशकांचा खर्च वाढलेला असताना आता खतटंचाईमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागात खताअभावी पिके पिवळी पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
काळ्या बाजाराचा धोका
खतटंचाईचा गैरफायदा घेत काही ठिकाणी खत काळ्या बाजारात जास्त दराने विकले जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अधिकच अडचणीत सापडला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांची मागणी
रासायनिक खतांचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, कृषी सेवा केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच खतवाटपात पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर रब्बी हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खताअभावी पीक पिवळे पडू लागले आहे. खर्च वाढतोय, उत्पन्न कमी होण्याची भीती वाटते. शासनाने तातडीने खताचा पुरवठा सुरळीत करावा. - नीलेश वानखडे, शेतकरी
