Rabi Crop: यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असली, तरी सध्या पिकावर घाटेअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. (Rabi Crop)
बहुतांश भागांत हरभरा पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना घाटेअळीने पिकावर हल्ला चढवला असून कळ्या व फुले गळून पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Rabi Crop)
जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली असून, अनेक ठिकाणी पीक जोमात वाढले आहे. मात्र, अनुकूल हवामान परिस्थितीचा फायदा घेत घाटेअळीने झपाट्याने वाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. (Rabi Crop)
घाटेअळी ही हरभऱ्यासाठी अत्यंत घातक कीड मानली जाते. ही कीड कळी, फुले आणि शेंगा कुरतडून मोठ्या प्रमाणात नुकसान करते.(Rabi Crop)
फवारणीचा खर्च वाढला
घाटेअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. अनेक ठिकाणी दोन ते तीन वेळा फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.
योग्य कीटकनाशकांची निवड न झाल्यास फवारणी निष्फळ ठरण्याची शक्यता असून, यामुळे खर्च वाढूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून शिफारस केलेल्या औषधांचा योग्य प्रमाणात वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानामुळे किडीचा फैलाव
दिवसाचे वाढलेले तापमान, रात्रीचा गारवा आणि काही भागांत ढगाळ हवामान यामुळे घाटेअळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत कीड जलद गतीने फैलावत असून, कळी–फुलोरा अवस्थेतील पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, या टप्प्यावर नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
वेळीच उपाययोजना गरजेच्या
कृषी विभागाने शेतकऱ्यांना दररोज पिकांची पाहणी करण्याचा सल्ला दिला आहे. घाटेअळी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, फेरोमोन ट्रॅप यांचा वापर करणे, तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जैविक व रासायनिक उपाय संतुलित पद्धतीने राबविल्यास किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येऊ शकतो.
मका पीकही किडींच्या विळख्यात
हरभऱ्याबरोबरच जिल्ह्यातील मका पिकावरही विविध किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. खोडकिड, लष्करी अळी तसेच पाने कुरतडणाऱ्या अळ्यांमुळे मक्याचे नुकसान होत असून, विशेषतः कोवळ्या अवस्थेतील पिकांवर याचा अधिक परिणाम जाणवत आहे. उगवणीनंतर पिकांची वाढ खुंटत असल्याचे चित्र अनेक शेतांमध्ये दिसून येत आहे.
रब्बी हंगामातील पिकांवर किडींचे संकट वाढत असताना, वेळेत योग्य उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल, असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
घाटेअळी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे व फेरोमोन ट्रॅपचा वापर करावा. कीड आढळताच शिफारस केलेल्या कीटकनाशकांची योग्य मात्रा वापरणे गरजेचे आहे. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
