Agriculture News : अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास ७० लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पण आता रब्बी हंगामात दहा लाख हेक्टर ने क्षेत्र वाढणार असून यासाठी खतांचा आणि बियाणांचा पुरवठा करण्यासंदर्भात कृषी विभाग सज्ज असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी लोकमत ऍग्रो शी बोलताना दिली.
आज पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था येथे कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी परिषदेच्या महासंचालक वर्षा लड्डा, कृषी आयुक्त सुरज मांढरे, स्मार्ट प्रकल्पाचे संचालक हेमंत वसेकर, कृषी विभागाचे सर्व संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नक्कीच रबी हंगामावर परिणाम झाला आहे. पण खरिपातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात प्रयत्न केले जाणार आहेत. राज्यात सध्या रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांचा आणि बियाणांचा आवश्यक साठा उपलब्ध आहे. युरिया खताची थोडी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे पण या संदर्भात केंद्र सरकार सोबत चर्चा करून त्यावर मार्ग काढला जाईल असेही कृषिमंत्री यावेळी म्हणाले.
"अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. केंद्र सरकारकडे नुकसानीचा अहवाल योग्य रीतीने जावा यासाठी प्रयत्न सुरू असून पंचनामे झाले की तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. आतापर्यंत शेतकऱ्यांना 2250 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 2 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्यात येत होती ती मर्यादा वाढवून आता 3 हेक्टरपर्यंत केली आहे." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.