- अनिल पाटील
जळगाव : बाळदसह पाचोरा तालुक्यातील परिसरात रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर मावा व चिक्का रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. ऐन निवडीवर व परिपक्वतेच्या टप्प्यावर असलेल्या ज्वारीवर या रोगाचे आक्रमण झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे ज्वारी पिकावर मावा व चिक्का रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी थंडगार वातावरण, तर दिवसा अचानक वाढणारे तापमान यामुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली असली तरीही या रोगावर अपेक्षित नियंत्रण न मिळाल्याने काही ठिकाणी ज्वारीची पाने पिवळी पडताना दिसत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणत्या हंगामात कोणते पीक घ्यावे हेच कळेनासे झाले आहे. कारण आता तिन्ही ऋतुमान बिघडून गेले आहे. गेल्यावर्षी खरीप हंगाम जेमतेम आला आणि आता रब्बी पिकांवरही रोगाचा फटका बसत आहे. रब्बी हंगामाकडून असलेल्या आशाही आता मावळत चालल्या आहेत.
- सौरभ सूर्यवंशी, शेतकरी, बाळद
कोरडवाहू रब्बी ज्वारी पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास पिकाच्या दोन्ही (गर्भावस्था व पोटरी अवस्था नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. पेरणीनंतरचे केलेल्या ओलावा व्यवस्थापनामुळे उत्पादनात २० टक्के वाढ होते. हवामानातील सततच्या बदलामुळे ज्वारी पिकावर मावा व चिक्का रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. सकाळी गारवा व दिवसा वाढलेले तापमान यामुळे या किडींचा प्रसार होतो. यावर - नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी क्लोरपायरिफॉसची फवारणी करावी.
- रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी, पाचोरा
