भंडारा : पारंपरिक धान शेतीच्या मर्यादा ओलांडून नगदी पिकांचा मार्ग येथील शेतकरी प्रवीण चिंतामण सेलोकर यांनी स्वीकारला आहे. बदलत्या हवामानाचा फटका, वाढता उत्पादन खर्च आणि धानाचे कमी दर यामुळे आर्थिक चिंतेत असलेल्या प्रवीणने तीन एकरांपैकी एक एकर मिरची लागवड करून तब्बल तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला.
प्रवीणने मिरची लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. मल्चिंग व ठिंबक सिंचन वापरून पिकाची गुणवत्ता टिकवली. योग्य रोपांची निवड, वेळेवर खत व रोग-कीड नियंत्रण यावर भर दिल्यामुळे उत्पादन जास्त झाले. एक एकर मिरचीसाठी रोपे, खत, रासायनिक औषधे, मल्चिंग, सिंचन व मजुरी यासह सुमारे ७५ हजार रुपयांचा खर्च आला. मात्र, नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे खर्च मर्यादित राहिला.
बाजारभाव मिळाल्यामुळे काढणीच्या काळात मिरचीला चांगला प्रवीणच्या मेहनतीला यश मिळाले. या यशामुळे प्रवीणची आर्थिक परिस्थिती सुधारली असून, आत्मविश्वासही वाढला आहे. परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देऊन मिरची लागवडीबाबत माहिती घेत आहेत. काही शेतकरी पुढील हंगामात मिरची किंवा इतर नगदी पिकांकडे वळण्याचा विचार करत आहेत.
तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या होऊ शकतो सक्षम
प्रवीणचा हा प्रयोग पारंपरिक शेतीच्या मर्यादांना ओलांडून बाजारपेठेची गरज ओळखून शेती केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, हे स्पष्ट करतो.
