गोंदिया : शेती व्यवसायात मशागत ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर खर्च वाढत असताना, आता कीटकनाशके व इतर कृषी औषधांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या पाच वर्षांत पिकांवरील कीटकनाशके, बुरशीनाशके, तसेच तणनाशकांच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम कृषी औषधांच्या किमतींवर झाला आहे. २०२० पासून फवारणीच्या खर्चात दरवर्षी १० ते १५ टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून येते; मात्र यंदा परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि विशेषतः तणनाशकांच्या छापील किमतींमध्ये (एमआरपी) ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
कृषी सहायकांचा सल्ला घेऊनच फवारणी करा
शेतीमध्ये पिकांवरील कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी फवारणी आवश्यक असते. मात्र, ही फवारणी करताना तांत्रिक ज्ञानासह अचूकता असणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी सहायक पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून नेमका कोणता रोग किंवा कीड आहे, याचे अचूक निदान करू शकतात. त्यामुळे कृषी सहायकांचा सल्ला घेऊनच फवारणीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कीटकनाशकांचे दर कमी करण्याची मागणी
शासनाने कीटकनाशके आणि शेतीसाठी उपयुक्त रसायनांवरील कर कमी करावेत, तसेच बोगस औषधांच्या विक्रीवर कठोर नियंत्रण ठेवावे. जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांचा खर्च मर्यादित राहील, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
खर्चाच्या तुलनेत हमीभाव अपुरा
एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पन्नाची खात्री नाही, तर दुसरीकडे औषधे, खते आणि बियाण्यांच्या वाढत्या किमतींमुळे शेती तोट्यात जात आहे. पाच वर्षापूर्वीच्या तुलनेत फवारणीवरील खर्च जवळपास दुप्पट झाला असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा हमीभाव अपुरा ठरत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
हवामान बदलाचा फटका
केवळ औषधांच्या दरवाढीमुळेच खर्च वाढलेला नाही, तर हवामानातील बदलांमुळे फवारणीच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अवकाळी पाऊस, तीव्र उष्णतेच्या लाटा तसेच पावसाच्या वेळापत्रकातील बदलांमुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी वारंवार फवारणी करणे भाग पडते.