Post Harvest Cotton Management : यंदा जानेवारी महिन्यानंतर कपाशीचा खोडवा (फरदळ) घेतल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने पुढील हंगामात पुन्हा या किडीचा तीव्र प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. (Post Harvest Cotton Management)
सध्या जिनिंग मिलमध्येही गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून येत असून, किडीचा प्रसार रोखण्यासाठी जिनिंग परिसरात कामगंध व प्रकाश सापळे लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.(Post Harvest Cotton Management)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने गुलाबी बोंडअळीच्या हंगामपश्चात व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार कापसाची (सिड कॉटन) दीर्घकाळ साठवणूक टाळावी व जिनिंग प्रक्रिया एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Post Harvest Cotton Management)
खराब झालेला कापूस प्रक्रियेसाठी किंवा तेल काढण्यासाठी अन्य ठिकाणी नेऊ नये, अन्यथा किडीचा प्रसार नव्या भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(Post Harvest Cotton Management)
जिनिंगमध्ये नियंत्रण उपाय महत्त्वाचे
गुलाबी बोंडअळीचा प्रसार रोखण्यासाठी जिनिंग मिलमध्ये विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कापूस व सरकी साठवणूक केलेल्या परिसरात २० ते २५ कामगंध सापळे लावावेत. सापळे लिंटच्या धुळीच्या थेट संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच आवश्यकतेनुसार प्रकाश सापळ्यांचाही वापर करावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
खोडवा नको, फेरपालट आवश्यक
हंगाम संपल्यानंतर कपाशीचा खोडवा (फरदळ) घेऊ नये. शेवटची वेचणी डिसेंबर-जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. वेचणीनंतर शेतात जनावरे चरण्यास सोडल्यास किडग्रस्त बोंडे व पाने नष्ट होण्यास मदत होते. पऱ्हाट्या उपटून शेतात किंवा शेजारी ढिग करून ठेवू नयेत. त्या थ्रेडर यंत्राद्वारे बारीक कूट करून कंपोस्ट तयार करणे आवश्यक आहे.
किडीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी हंगामपश्चात खोल नांगरणी करावी, जेणेकरून जमिनीतील कोष उन्हामुळे नष्ट होतील किंवा पक्ष्यांचे भक्ष्य ठरतील.
तसेच कपाशीची पूर्वमान्सून लागवड टाळावी व पिकांची फेरपालट करावी. कमी कालावधीचे (सुमारे १५० दिवस) आणि एकाच वेळी वेचणीस येणारे संकरित वाण निवडावेत, असेही कृषी विभागाने सुचविले आहे.
गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी जानेवारीनंतर कपाशीचा खोडवा घेऊ नये. जिनिंग मिलमध्येही कामगंध व प्रकाश सापळे लावणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
